देश विदेश

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यावर निर्बंध;जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सरकारने दिल्या सूचना

निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यावर निर्बंध;जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सरकारने दिल्या सूचना

निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी

बारामती वार्तापत्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती राज्यभरात मोठया उत्साहात मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात साजरी केली जाते. मात्र कोरोना आटोक्यात आला असला तरी कोरोनाचे सावट कायम असल्याकारणाने खबरदारी म्हणून शिवजयंतीसाठी शासनाकडून निर्बंध लावण्यात आले असून जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता.त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात.परंतु यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित असल्याचे म्हटले असून सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून फक्त १० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.covid-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.अशा मार्गदर्शक सूचना व निर्बंध शासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या असून त्यामुळे शिवभक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!