जनकल्याण योजनांचा बारामती तालुक्यात जागर
नागरिकांचा चांगला प्रतिसाद
बारामती वार्तापत्र
कोरोना काळात राज्य शासनाने जनतेच्या हितार्थ अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली. या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांना अवगत व्हावी या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोककलेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शासनाच्या योजनांची जनजागृती करण्यात येत आहे.
बारामती तालुक्यातील बारामती शहर, सोमेश्वरनगर, माळेगाव व काटेवाडी येथे कार्यक्रम सादर करण्यात आले.
गेली दोन वर्ष जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावे लागले. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अशा वेळी राज्य शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना राबवून सामान्य जनतेला धीर दिला. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात कोविड काळात नागरिकांना केलेली मदत, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिवभोजन थाळी योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना, खावटी योजना, मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण, ऊस तोड कामगारांसाठी विमा योजना, मेट्रो, महामार्ग, रस्ते सुधार योजना, महिला सबलीकरण, रिक्षा चालकांना अनुदान, कामगारांसाठी श्रम ई कार्ड योजना यासह विविध योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून या पथकांनी दिली.
कला पथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.