जयभवानी गड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्याकडून अनेक गोरगरीब कुटुंबांना आनंद भेट चे वितरण
सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून केली मदत
जयभवानी गड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्याकडून अनेक गोरगरीब कुटुंबांना आनंद भेट चे वितरण
सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून केली मदत
बारामती वार्तापत्र
समाजातील गोरगरीब, वंचित कुटूंबियांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या अंधःकारमय जीवनातील दिपावली सणात आनंदमयी प्रकाश यावा यासाठी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जयभवानी गड विकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले व उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी पुढाकार घेत प्रतिष्ठानच्या वतीने या गरीब कुटूंबांना मंगळवार (दि.10) रोजी आनंद भेट चे वितरण करण्यात आले.इथुन पुढे दरवर्षी तीन हजार गरजू गरीब कुटूंबास आनंद भेट देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या आनंद भेट चे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, बावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.एन.लातूरे,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक प्रदीप गुरव व पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना कामधेनू परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे म्हणाले की, ढोले कुटुंबियांनी गरीबीच्या झळा, वेदना सोसल्या आहेत.त्यांनी याची सामाजिक जाणीव ठेवली आहे. राज्यावर कोरोना तसेच नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले. या परिस्थितीत लाखेवाडी परिसरातील शेकडो उपेक्षित,गरीब कुटुंबांना ढोले कुटुंबांच्या या आनंद भेट मुळे गोड घास खाता येणार आहे. एका गरीब कुटुंबातून जन्म घेवून,गरिबांच्या हजारो मुलाबाळांना अद्ययावत शिक्षण प्रणाली देण्याची भूमिका श्रीमंत ढोले यांनी घेतली असल्याचे आसबे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत ढोले म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवलेली आहे.तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षणात पुढे गेला पाहिजे,यासाठी लातूर पॅटर्न ही संस्था राबवत असून,कमी वयाची संस्था असून देखील राज्यांमध्ये अनेक परीक्षेत प्रथम येण्याचा मान या संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळवला असल्याचे ढोले यांनी सांगितले . कोरोना व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी, गरीब कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. रितीरिवाजाप्रमाणे सालाबादप्रमाणे दिवाळी सण या कुटुंबात साजरा व्हावा. या उद्देशाने दिवाळी आनंद भेट मधून सणासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले असून आगामी काळातही ही श्रृखंला सामाजिक जाणिवेतून अशीच सुरु राहणार असल्याची ग्वाही श्रीमंत ढोले यांनी यावेळी दिली.
या वेळी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले व संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांनी केले, तर आभार प्रदिप गुरव यांनी मानले.