जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 हजार 632 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग
जळगाव दि. 14 – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 14 एप्रिल, 2020 रोजी एकूण 95 नवीन रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी 82 रुग्णांना कोणतीही कोरोना सदृष्य लक्षणे नसलयाने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 9 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर 13 रुग्णांना ॲडमिट करण्यात आले आहे. तसेच चौदा रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर 15 रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 247 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 228 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन रुग्णांचे अहवाल रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एका रूग्णावर महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. या रुग्णाचा 14 दिवसांनंतरचा फेर तपासणी अहवालही निगेटिव्ह आला आहे. तर पंधरा दिवसानंतरचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठविण्यात आला असून अद्याप त्याचा अहवाल अप्राप्त आहे. तर एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रूग्णास मधुमेह व दम्याचाही आजार होता.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 हजार 632 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी 3385 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. यापैकी आतापर्यंत 170 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.