जामखेडमधील आणखी ०३ व्यक्ती कोरोना बाधीत*

अहमदनगर, दि. २६- जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ०३ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या ४३ झाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल ४१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ३८ व्यक्तींचे अहवाल काल रात्री प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित ०३ अहवालाची प्रतीक्षा होती. ते अहवाल आज दुपारी प्राप्त झाले. त्यात, जमखेड मधील या तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये ४५ आणि ५० वर्षीय पुरुष तर ३५ वर्षीय महिला असे तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधीत आढळून आल्या.

यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटल मध्ये १४ रुग्ण असून या तिघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १४९५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४१९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. अजून १५ अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या ६९० व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून १२२ जणांना हॉस्पिटल मध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात १०२, एआयएमएस मध्ये ०६ व्यक्ती उपचार घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!