जीम, हॉटेलांंबाबत रोहित पवारांनी मांडले व्यक्तिगत मत; सरकार ऐकणार ?.
जीम, हॉटेलांंबाबत रोहित पवारांनी मांडले व्यक्तिगत मत; सरकार ऐकणार?
राज्यातील रेस्टॉरंट, जीम आणि कोचिंग क्लासचे चालक-मालक पुरेशी काळजी घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मांडलंय.
अहमदनगर: बारामती वार्तापत्र
करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं अनलॉकला सुरुवात केली आहे. मात्र, संसर्गाच्या दृष्टीनं धोकादायक असलेले काही उद्योग, व्यवसाय अद्यापही बंद आहेत. हॉटेल, जीम आणि कोचिंग क्लासचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आता या उद्योग, व्यवसायासाठी सरकारला साकडं घातलं आहे.
रोहित पवार यांनी आज या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘करोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची खबरदारी रेस्टॉरंट, जीम आणि क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. अर्थात, हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याबाबत सरकारनं योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसंच, सरकार तसा निर्णय घेईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
‘पुनश्च हरिओम’ म्हणत सरकारनं करोनाच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, हळूहळू अनेक गोष्टी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही व्यायामशाळा, रेस्टॉरंटना परवानगी देण्यात आलेली नाही. या व्यवसायातील चालक, मालक सातत्यानं सरकारला याबाबत विनंती करत आहेत. करोनाच्या अनुषंगानं सर्व प्रकारची काळजी घेण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यापूर्वी रोहित पवार यांनी तरुणांना नोकरीधंद्यासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं.