जीवनावश्यक वस्तु पुरवणाऱ्या सेवांसाठी नागरी भागात 11 ते 5 पर्यंतची वेळ निश्चित
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 14 – राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासुन लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिक अनावश्यकरित्या रस्त्यांवर फिरुन गर्दी करताना दिसून येत आहे. तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व किराणा मालाची दुकाने (घाऊक व किरकोळ) सर्व दूध विक्री केंद्रे, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्यावर हातगाडीद्वारा विक्री करणारे फिरते विक्रेते, काही संस्थाद्वारे करण्यात येणारे बाजार कोणत्याही प्रकारे रस्त्यावर अथवा गल्लोगल्ली जाऊन विक्री करणारे विक्रेते यांचे व्यवहार 15 ते 30 एप्रिल, 2020 पर्यंत केवळ सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेतच सुरू ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
तसेच सर्व संबंधितांद्वारे देण्यात येणारी घरपोच सुविधा (होम डिलीव्हरी) देखील केवळ याच वेळेत पुरविण्यात यावी. या वेळेव्यतिरिक्त नमूद घटक कोणत्याही प्रकारे विक्री करताना आढळून आल्यास नमूद कायद्यातील तरतुदीसनुसार शिक्षेस पात्र राहील. या आदेशाचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच सर्व संबंधित इंन्सिडन्ट कमांडर्स यांची राहील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकरीता संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या अधिकारी, कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.