स्थानिक

जीवन सुंदर करण्यासाठी जीवन समजून घ्या- गणेश शिंदे

आपल्यापैकी कोणीही या भूतलावर कायमचे राहणार नाही

जीवन सुंदर करण्यासाठी जीवन समजून घ्या- गणेश शिंदे

आपल्यापैकी कोणीही या भूतलावर कायमचे राहणार नाही

बारामती वार्तापत्र

निसर्गापुढे आपण कोणी नाही, जीवन सुंदर करायचे असेल तर निसर्गाशी जुळवून घेत वाटचाल केली पाहिजे. येतानाही काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जाण्याची सोय नाही, मात्र माणसाला हे समजूनच घ्यायचे नाही, ही बाब दुर्दैवी आहे. जीवन सुंदर करण्यासाठी जीवन समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.

येथील एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित प्रतिबिंब व्याख्यानमालेत शनिवारी (ता. 26) गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर बारामतीकरांशी संवाद साधला, त्या प्रसंगी ते बोलत होते.

गणेश शिंदे म्हणाले, आपल्यापैकी कोणीही या भूतलावर कायमचे राहणार नाही, त्यामुळे प्रत्येकाला निसर्गाने जी भूमिका ठरवून दिली आहे, ती भूमिका समजून घेत जीवन जगले पाहिजे. आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला काय भूमिका दिलेली आहे हेच लोकांना अनेकदा समजत नाही.

ज्या दिवशी आपण कायमस्वरूपी इथे राहणार नाही हे समजेल, त्या दिवशी जीवन खऱ्या अर्थाने सुंदर होण्यास सुरुवात होईल. मनुष्याने जीवनात दुःखाचा इतका भाऊ केलेला आहे की सुखाचे क्षण त्याला टिपता येत नाहीत.

आपल्यावर जी संकटे येतात, त्या संकटाकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं ती दृष्टी विकसित होण्याची खरी गरज आहे. आपल्यातील अहंकार आणि अहंकारातून निर्माण झालेली तुलना हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. जोपर्यंत दुसऱ्याच्या आनंदात तुम्ही स्वतःचा आनंद शोधत नाही तोपर्यंत तुमचे जीवन सुंदर होणार नाही.

साध्या गोष्टींमध्ये आनंद असतो मात्र तो शोधता यायला हवा. कृतज्ञतेचा भाव कायम आपल्या मनामध्ये असला पाहिजे. नव्या पिढीला कृतज्ञता शिकवण्याच्या आता गरज निर्माण झाली आहे. आपण किती लोकांना मदत करू शकलो आपण किती लोकांचे जीवन सुंदर करू शकतो याचेही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला गणेश शिंदे यांनी दिला. मानवी मनामधील संवेदनशीलता ही कायम जपायला हवी परस्परांप्रती असलेला जिव्हाळा व प्रेम हे देखील कायम ठेवले तरच खऱ्या अर्थाने जीवन सुंदर होईल, असे त्यांनी सांगितले. आई वडील आजी आजोबा यांच्यासह कुटुंबाची असलेली नाळ हे कायमस्वरूपी जपून ठेवा, आयुष्याचा खरा आनंद त्यातच आहे असे त्यांनी नमूद केले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, फोरमचे सदस्य शब्बीर बारामतीवाला व प्रवीण माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ज्ञानेश्वर जगताप यांनी परिचय करून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!