टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी शिक्षण आयुक्त तुकाराम सुपेला जामीन मंजूर
परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते.

टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी शिक्षण आयुक्त तुकाराम सुपेला जामीन मंजूर
परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते.
पुणे,प्रतिनिधी
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे तत्कालीन प्रमुख तुकाराम सुपे यांना जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी तुकाराम नामदेव सुपे यांना दोन गुन्ह्यात सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तुकाराम सुपे यांना 17 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील सायबर पोलिसांनी अटक केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
2019-20 साली झालेल्या टीईटी परीक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या परिक्षेच्या निकालातील अंतिम 16 हजार 705 पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेला डिजिटल पुराव्याचा एकत्रित तपास सुरू आहे.
तसेच परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण सात हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करून त्यांना पात्र केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
तसेच टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं होतं. आरोपी सुकाराम सुपे, सुखदेव ढेरेसह १५ जणांविरोधात ३,९९५ पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणातील प्रितेश देशमुखसाही याआधी जामीन मंजूर झाला होता.
तुकाराम सुपेच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी तुकाराम सुपे यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं होतं. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले होते.
सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती. पण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं होतं. याआधी सुपे याच्या घरी पोलिसांना 88 लाख रुपयांचं सोनं आणि काही रोकड मिळाली होती.