बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे

बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर अंतिम मतदार यादी १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४ असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. मात्र प्रशासनानं तयारी सुरू केली आहे.
अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून १ जानेवारी २०२६पर्यंत नाव नोंदविलेले मतदार पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. तर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.
who is Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांचा परिचय
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Profile) यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) याठिकाणी झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा जन्मतःच लाभलेला होता. १९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. अगदी पहाटे पासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केलं. त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आलं. या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कामामुळं सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सुरूवात झाली.
बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम सुनेत्रा पवारांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला.(Sunetra Pawar Profile)
Sunetra Pawar: घरापासून राजकारणापर्यंत अजित पवारांना दिली साथ
लग्नानंतर अजित पवार यांच्यासोबत शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय ते गाईगुरे सांभाळणे, दूध काढणे अशी सर्व कामं सुनेत्रा पवार यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत आपली घरं सांभाळणे, नातेसंबंध जपणं, सामाजिक कार्य करणं, कठीणप्रसंगी दादांना साथ देणं आणि सल्लामसलत करणं, ही जबाबदारी त्यांनी पार पडली.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर आज पहिली महिला उपमुख्यमंत्री असा एक मोठा विक्रम होणार आहे. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्षामध्ये राजकारणात प्रवेश झाला.
त्यापूर्वी पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीवेळा त्या उत्साहाने प्रचारात उतरत असत आणि बारामतीमध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर सुप्रिया सुळेंविरोधात त्या लोकसभा निवडणुकीत उतरल्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला, यानंतरही त्या खचल्या नाहीत.
त्या जनसेवेत सक्रिय राहिल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर विराजमान होण्याचा मान मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.
तर कलम १६४(४) : भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसतानाही मंत्री (उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री) म्हणून नियुक्त होऊ शकते. मात्र, हे पद टिकवून ठेवण्यासाठी, शपथ घेतल्यापासून सलग सहा महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य असते. जर ते या कालावधीत सदस्य झाले नाहीत, तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे आता बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार लढणार असल्याची माहिती आहे.






