डाळिंबाला ‘तेल्या’ रोगाने ग्रासले.
पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
इंदापूर:- प्रतिनिधी
ढगाळ वातावरण, कडक ऊन, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, यामुळे डाळिंबाच्या क्षेत्रात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हजारो एकर क्षेत्रातील डाळींब बागा ह्या तेल्या रोगाने बांधीत झाल्या असून इंदापूर तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यांचे चित्र इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
डाळींब बागाचे बहार धरल्यापासुन ते विक्री साठी बाजारात जाईपर्यंत शेतकरी लाखो रुपये औषधे खते यांच्या वर खर्च करून जीवापाड काबाडकष्ट करून बागा उत्तम प्रतिच्या पिकवत असतात. परत मागील पाच सहा वर्षापासून डाळींब फळावर तेल्या सारख्या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यावर आळा घालण्यासाठी शेतकरी अनेक महागडे औषध फवारणी करत आहेत. मात्र डाळींब हे विक्री साठी बाजारात जाण्या अगोदरच त्याच्यावर तेल्या सारख्या रोगाने अतिक्रमण केलेले असते.त्यामुळे विक्री साठी अगदी ५ ते १० टक्के सुद्धा डाळींब बाजारात जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना औषध व खत विक्री दुकानदारांचे पैसे देणे सुद्धा अवघड होत आहे.यामुळे डाळींब उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे.यामुळे इंदापूर तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा आर्थिक तोटा सोसावे लागत आहे.
तरी सध्या तालुक्यातील तेल्या ग्रस्त डाळींब बागाचे कृषी विभागाने पाहणी करुन रीतसर पंचनामे करून खर्चात पटीत शासकीय नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी इंदापूर तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे