डाॅक्टरांवर हल्ला करणाऱ्याला होणार २४ तासात अटक व तडीपारीची कारवाई..
आरोपींना तातडीने अटक करू, शिवाय त्याच्यावर तडीपारीची कारवाई करू असे आश्वासन प्रशासनाने दिले.
डाॅक्टरांवर हल्ला करणाऱ्याला होणार २४ तासात अटक व तडीपारीची कारवाई..
आरोपींना तातडीने अटक करू, शिवाय त्याच्यावर तडीपारीची कारवाई करू असे आश्वासन प्रशासनाने दिले.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील आरोग्य हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालून डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपीस 48 तासांच्या आत अटक करा, अन्यथा आम्ही सोमवारपासून रूग्णसेवा बंद ठेवू असा इशारा डॉक्टरांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन दिला. तर प्रशासन डॉक्टरांच्या पाठीशी असून आरोपींना तातडीने अटक करू, शिवाय त्याच्यावर तडीपारीची कारवाई करू असे आश्वासन प्रशासनाने दिले.
बारामतीतील आरोग्य हॉस्पिटल मध्ये रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर गोंधळ घालणाऱ्यांना समजावण्यासाठी आलेल्या भूलतज्ञ डॉक्टर सुजित आडसूळ यांना मारहाण करण्यात आली. यातील शिवाजी जाधव या आरोपीस अठ्ठेचाळीस तासांच्या आत अटक करा, अन्यथा आम्हाला कोविड सेवेसह रूग्णसेवा कामे बंद ठेवावी लागतील, भले आम्हाला अटक केली तरी चालेल अशा आक्रमक भूमिकेत आज आय एम ए, मेडिकोज गिल्ड सह डॉक्टरांच्या संघटनांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यापुढे भूमिका मांडली.
त्यांना निवेदन दिल्यानंतर कांबळे व शिरगावकर या दोघांनीही प्रशासनाच्या वतीने संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची कार्यवाही चालू असल्याचे आश्वासन दिले. तसेच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना या रुग्णावर यापूर्वीही ही गुन्हे असतील तर त्याच्यावर तडीपारीची कारवाई करा अशी सूचना केली आणि नारायण शिरगावकर यांनी आम्ही आरोपीस तातडीने अटक करू, प्रशासन डॉक्टरांच्या पाठीशी असल्याचे ग्वाही दिली.
यावेळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कुमार तांबे ,सिल्वर ज्युबिली उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे, बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण राज यादव, मेडिकोज गिल्ड चे अध्यक्ष डॉक्टर संजय पुरंदरे, सचिव डॉक्टर तुषार गदादे,आय एम ए च्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी सोळंके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, यांच्यासह मेडिकोज् गिल्ड, आय एम ए, निमा व होमिओपॅथी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.आय एम ए चे सेक्रेटरी डॉ संतोष घालमे यांनी आभार मानले .