डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन) कोणासही औषंधाची विक्री करु नये
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 14 – वारंवार सुचना आदेश निर्गमित करुनही जिल्ह्यातील नागरीक/व्यक्ती औषधे, गोळ्या खरेदी करण्याचा बहाणा करुन अनावश्यकरीत्या रस्त्यांवर फिरतांना आढळून येत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व औषधी दुकाने/फार्मसी केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी प्रामुख्याने औषधांची घरपोच सेवा/सुविधा (होम डिलीव्हरी) देण्यावर भर द्यावा. सर्व औषधी दुकाने/फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन) कोणासही औषंधाची विक्री करु नये. संबधित औषध विक्रेत्यांनी ग्राहकांस औषध विक्री केल्यानंतर डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांच्या प्रिस्क्रीप्शनवर औषध दिल्याबाबतचे (डिलीव्हर्ड) शिक्का मारावा. असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे.
या बाबतीत कोणत्याही औषधी दुकाने/फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी उपरोक्त नमूद तरतूदींचे उल्लंघन केल्यास संबंधित क्षेत्रातील औषध निरीक्षक यांनी संबंधितांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सर्व नागरीक/व्यक्ती यांनी देखील अनावश्यकरीत्या औषधे/गोळ्या यांचा बहाणा करुन रस्त्यावर फिरणे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.