राजकीय

‘तुम्ही मला मते द्या, आम्ही तुम्हाला लस देऊ’- शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपावर हल्लाबोल

'मतं देणाऱ्यांनाच कोरोनाची लस देण्याचं आश्वासन म्हणजे भाजपची क्रूरता'

‘तुम्ही मला मते द्या, आम्ही तुम्हाला लस देऊ’- शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपावर हल्लाबोल

‘मतं देणाऱ्यांनाच कोरोनाची लस देण्याचं आश्वासन म्हणजे भाजपची क्रूरता’

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

‘बिहारमध्ये NDA सरकार आलं तर बिहारच्या सर्व जनतेला कोव्हिडची लस मोफत देण्यात येईल’ अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली आहे. संपूर्ण देश कोव्हिडच्या आरोग्य संकटाशी लढत असताना भाजपने कोरोनाची लस हा निवडणुकीचा मुद्दा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपच्या या आश्वासनावर विरोधी पक्षांकडूनही टीका सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या आश्वासनाला ‘क्रूरता’ म्हटलंय.

“भाजपचं जिथं सरकार आहे, तिथं कोरोनाची लस मिळणार नाही का? जेपी नड्डा आणि हर्षवर्धन यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे. मोदी तर म्हणाले होते की, प्रत्येक घरार्यंत लस कशी पोहोचेल, याची यंत्रणा बनवत आहेत.

मग आता भाजपनं वेगळी राजकीय यंत्रणा तयार केलीय का? भाजपला मत जाईल, त्यांनाच लस मिळेल का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Earlier it used to be – ‘tum mujhe khoon do,main tumhe azadi dunga’ & now it’s – ‘tum mujhe vote do,hum tumhe vaccine denge’.Only those who vote for BJP will get vaccine, it shows BJP’s discriminatory nature: S Raut,Shiv Sena on BJP’s promise of free COVID vaccine to all in Bihar

संजय राऊत पुढे म्हणाले, “एकेकाळी घोषणा होती, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा. आता नवीन घोषणा झालीय, तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सिन देंगे. ही एकप्रकारची क्रूरता आहे. बिहारमध्ये कुणी भाजपला मत दिलं नाही, तर त्यांना लस देणार नाही का?”
“हे काय सुरू आहे? देश विभागण्याचं काम करतोय का आपण? जात आणि धर्मावर आपण देशाला विभागतोय, कोरोना लशीवरून विभागतोय. हे योग्य नाही,” असंही राऊत म्हणाले.
दुसरीकडे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर टीका केलीय. थोरात म्हणाले, “कोरोना लशीसाठी भारतीयांचा पैसा खर्च होणार आहे. मग तो फक्त बिहारसाठीच का? इतर राज्यात लस देणार नाही? का त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील? हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे.”

पाटण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर म्हणाल्या की ‘तीन स्वदेशी लसी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत, जर त्यांच्या उत्पादनाला हिरवा कंदील मिळाला तर बिहारमध्ये आम्ही प्रत्येकाला मोफत लस देऊ शकू. आमच्या संकल्पपत्रातलं हे पहिलं आश्वासन आहे.’ भाजपची ही घोषणा अनेक प्रश्न उपस्थित करते.

लस वाटपात बिहारला प्राधान्य देणार का?
एका जागतिक आरोग्य संकटाचं भाजप राजकारण करत असल्याचा आरोप होतोय. 19 ऑक्टोबरला आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी 2020च्या अखेरपर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीला लस येण्याची शक्यता आहे असं म्हटलं होतं.

ती लस आल्यानंतर तिचं वाटप कसं करायचं आणि कुणाला प्राधान्य द्यायचं यासंबंधी काही सूचना तयार केल्या जात आहेत आणि त्या सर्व राज्यांना पाठवण्यात येत आहेत असंही आरोग्यमंत्री म्हणाले होते. मग आता निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजप बिहारमध्ये मोफत लस वाटण्याची घोषणा का करतंय हा प्रश्न आहे.

आरोग्य मंत्र्यांनीच असंही सांगितलं होतं की लस आली की सर्वप्रथम ती आरोग्य कर्मचारी, वृद्ध तसंच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्राधान्याने देण्यात येईल. जर खुद्द आरोग्य मंत्र्यांनी हे सांगितलं होतं तर मग भाजप बिहारमध्ये सरसकट सर्वांना ही लस मोफत वाटण्याची घोषणा कशी काय करतोय?

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. ‘केंद्र सरकारकडून राज्यांना लस नाममात्र दरात दिली जाईल. राज्यांनी ठरवायचं की ते लोकांना लस मोफत देणार की शुल्क आकारणार. आरोग्य हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे त्यामुळे बिहार भाजपने लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सोपं आहे.’

लस हा निवडणुकीचा मुद्दा कसा बनला?
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात लसीला प्रथम स्थान दिल्यानंतर अर्थातच इतर पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाने भाजपवर टीका करताना म्हटलंय, ‘कोरोनाची लस देशाची लस आहे, भाजपची नाही! लसीचा राजकीय वापर हेच दाखवतो की यांच्याकडे रोगराई आणि मृत्यूचं भय दाखवण्याखेरीज काहीही पर्याय नाहीयेत. बिहारी स्वाभिमानी आहेत, थोड्या पैशांसाठी आपल्या मुलांचं भवितव्य विकत नाहीत.’

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर टीका करताना म्हटलं, ‘भाजपच्या या घोषणेवर आम्ही तीव्र आक्षेप घेतो. बिहारच्या लोकांचा असा अपमान करू नका. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा मजुरांचं स्थलांतर सुरू होतं तेव्हाही नितीश कुमार आणि सुशील मोदी यांनी सहानुभुती दाखवली नव्हती.’
शशी थरूर यांनीही भाजपच्या घोषणेवर निवडणूक आयोग कारवाई करेल का असा प्रश्न विचारला. ‘तुम मुझे वोट दो मैं तुम्हे वॅक्सीन…. हे वर्तन अत्यंत धिक्कारण्यासारखं आहे. निवडणूक आयोग निर्मला सीतारमण आणि त्यांच्या निर्लज्ज पक्षावर कारवाई करेल का?’

मुळात लसीसारखा मुद्दा निवडणूक प्रचारात आलाच कसा याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर यांनी म्हटलं, ‘ही अत्यंत हास्यास्पद घोषणा आहे. लस लोकांपर्यंत पोहोचवणं हे सरकारचं कर्तव्यच आहे त्यामुळे याला निवडणुकीचा मुद्दा बनवणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यात बिहारची आरोग्य यंत्रणा अपुर पडली. तिला बळकटी द्यायचं सोडून आता अशा घोषणा करणं हे हास्यास्पद आहे.’

निवडणूक आयोगाकडे तक्रार
कार्यकर्ते साकेत गोखले यांनी भाजपच्या घोषणेनंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. केंद्र सरकार कोव्हिड लशीच्या वितरणाचं धोरण ठरवेल आणि आतापर्यंत असं कोणतंही धोरण ठरलेलं नाही. भाजपची घोषणा ही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करते तसंच बिहारच्या लोकांचीही दिशाभूल करते असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

बिहारसाठी मुख्य मुद्दा रोजगाराचा
अनेक वर्षं बिहारचं राजकारण आणि निवडणुकांचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी बोलताना एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली ती म्हणजे बिहारमध्ये मुख्य मुद्दा आहे नोकऱ्यांचा. आपल्या निवडणूक प्रचारात तेजस्वी यादव हे अत्यंत हिरीरीने रोजगाराचा मुद्दा मांडतायत, जदयू आणि भाजपने त्यांची खिल्ली उडवली.

तेजस्वी यांनी 10 लाख नोकऱ्या बिहारमध्ये देण्याची घोषणा केल्यानंतर त्यासाठी पैसे कुठून आणणार, त्यांच्या पक्षाने यापूर्वी केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा इथे वापरणार का अशी तेजस्वी यादव यांची टर उडवली गेली. पण आता भाजपसुद्धा आपल्या जाहीरनाम्यात 19 लाख नोकऱ्यांचं आश्वासन देतोय.

याबद्दल मणिकांत ठाकूर म्हणाले, ‘रोजगाराचा मुद्दा तरुण मदारांना आकर्षित करतोय. तेजस्वी यादव हा प्रभावीपणे मांडत आहेत. हा मुद्दा लोकांना खूप भावून जाईल म्हणून भाजपकडूनही आता नोकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला जातोय. ही तेजस्वी यांच्या प्रचारावर दिलेली प्रतिक्रिया आहे.’

लसीव्यतिरिक्त भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 19 लाख लोकांना रोजगार, बिहारला IT Hub म्हणून नावारुपाला आणणे, तीन लाख शिक्षकांची भरती, गृहयोजना, यांसारख्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. काँग्रेसने रोजगारांच्या आश्वासनावर टीका करताना म्हटलंय की जर मोदी सरकारने आधी वचन दिल्याप्रमाणे 2 कोटी नोकऱ्या दिल्या असत्या तर आज 19 लाखांचं आश्वासन द्यायची वेळ आली नसती.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात 2 एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पिण्याच्या पाण्याची योजना, मुलींसाठी केजी ते पीजी मोफत शिक्षण अशा घोषणा केल्या आहेत.
चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने तरुण मतदारांना डोळ्यापुढे ठेवून बिहारमध्येच कोचिंग सिटी बनवण्याची घोषणा केली आहे. तसंच राज्यात सीतेचं मंदिर आणि महिलांना मोफत बस प्रवासासारखी आश्वासनंही दिली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!