राजकीय

दिल्लीत सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसलाय; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर पलटवार

"आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता"

दिल्लीत सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसलाय; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर पलटवार

“आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता”

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शाब्दिक वाद आता एकमेकांचा बाप काढण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना राष्ट्रवादीनं थेट मोदींना लक्ष्य केलं होतं. राष्ट्रवादीनं केलेल्या टीकेला उत्तर देताना आता चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

“चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.

“आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता आहे. दिवसभर शेतात राबणारा शेतकरी आमचा मायबाप आहे. दिवसभर अखंड मेहनत करणारा कामगार आमचा मायबाप आहे. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्यांची जर कोणी दिशाभूल करत असेल, तर त्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करूच! आणि राहिला प्रश्न दिल्लीत कोणाचा बाप बसला आहे याचा, तर ते मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या वारसदारांची चिंता तुम्ही करू नये, जे विचारांनी स्पष्ट, सरळ आणि खरे असतात, त्यांचे वैचारिक वारसदार हे नेहमी तयारच असतात. तुमच्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी,” अशा शब्दात पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शशिकांत शिंदे काय म्हणाले होते?

“चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत, याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता. देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कमागार विधेयक आणले, त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपाची? कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्यासाठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे,” अशी टीका शिंदे यांनी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!