स्थानिक

दिव्यांगाच्या शिक्षणासाठी सामाजिक जाणिवा जागृत होण्याची आवश्यकता : यशवंत ओमासे

मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळणे आवश्यक

दिव्यांगाच्या शिक्षणासाठी सामाजिक जाणिवा जागृत होण्याची आवश्यकता : यशवंत ओमासे

मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळणे आवश्यक

बारामती वार्तापत्र

समाज्याच्या प्रमुख प्रवाहात प्रत्येक दिव्यांग आणण्यासाठी शासनाबरोबर इतर नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे व शिक्षणासाठी सामाजिक जाणिवा जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा दिव्यांग संघटनेचे सदस्य यशवंत ओमासे यांनी केले.

०३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो त्या पार्श्वभूमीवर बारामती मध्ये आयोजित ‘दिव्यांग आणि शिक्षण व्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन करताना यशवंत ओमासे यांनी विचार व्यक्त केले.

या प्रसंगी दिव्यांग संघटनेचे महेश शिंदे, आनंद राऊत,सर्जेराव चौधर ,अतुल गोसावी व इतर मान्यवर उपस्तीत होते.

शिक्षण हे उन्नतीचे माध्यम आहे .दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी दिव्यांग हक्क अधिनिय २०१६ मध्ये दिव्यांगाना समावेशित शिक्षण भेदभाव विरहीत देणे , शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थानमध्ये दिव्यांग प्रवर्गनिहाय अडथळा विरहीत इमारत , परिसर बनवून विविध सोयी सुविधा पुरवण्याची तरतुद केली आहे.

समावेशित शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी विविध उपाय योजना करण्याचे दिव्यांग हक्क अधिनियमात नमुद केले आहे.शासनातर्फे यु-डायस प्रणालीत दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा पुरवल्या जातात याची माहिती देण्याच्या सूचना शाळांना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत .

दिव्यांग हक्क अधिनियमातील दिव्यांग शिक्षणा संदर्भातील तरतुदीची प्रभावी अमलंबजावणी करण्यासाठी जिल्हास्थरावर शिक्षणाधिकारी तर महानगरपालिका स्थरावर शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांची नोडल अधिकारी व तक्रार निवारण अधिकारी म्हणून शासन आदेशाने नियुक्ती केली आहे .

दिव्यांग विद्यार्थी मूल्यमापना बाबत ही विविध सोयी सुविधा देण्याबाबत शासन आदेश आहेत .दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगाचे २१ प्रकार नमुद केले आहेत .या २१ प्रकारातील दिव्यांग प्रवर्गानुसार व तीव्रतेनुसार प्रत्येक दिव्यांग मुला मुलींचे शैक्षणिक प्रश्न वेगळे असून त्याच्या समोरचे अडथळे वेगळे आहेत .

दिव्यांग हक्क अधिनियमानुसार ही मुले सर्वसामान्य मुले शिक्षण घेत असलेल्या शाळेत ही शिक्षण घेऊ शकतात.दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबाबतच्या तरतुदी ,त्यांना द्यावयाच्या सुविधा बाबत आजही अनेक शिक्षक , पालक , शालेय प्रशासनास नेमकेपणाणे माहित नाहीत त्यामुळे दिव्यांग मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही अनेक ठिकाणी नकारात्मक दिसतो ; परिणामी अनेक दिव्यांग मुले मुलीं शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

आज शहरी व ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात बहुमजली शैक्षणिक इमारती उभ्या राहत आहेत अशा इमारती अडथळा विरहीत नसल्याने दिव्यांग मुलांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे .

दिव्यांग मुलींच्या समोरील अडथळे हे ही भिन्न स्वरूपातील आहेत. ग्रामीण भागात आज ही दिव्यांग प्रमाणपत्र कसे काढावे या बाबत माहिती नसल्यामुळे ही अनेक खरे दिव्यांग मुले मुली शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहत आहेत .शिक्षण हक्क अधिनियम २००९ मध्ये ही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणास महत्त्व दिले आहे.

शिक्षण हक्क अधिनियम २००९ व दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ पारित होऊन खूप मोठा कालावधी लोटला आहे तरी ही दिव्यांग शिक्षणा संदर्भातील अनेक तरतुदी केवळ कागदावरच राहिल्या आहेत .दिव्यांग मुलांचा सामाजिक भावनिक व व्यक्तीमत्व विकास होण्यासाठी या मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे .

दिव्यांग मुलांना शिक्षण प्राप्त झाले तरच राज्यघटनेतील समतेचे तत्व मूर्त स्वरूपात आले असे म्हणता येईल .दिव्यांग मुलांचे पालक , शिक्षक दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक व इतर हक्का बाबत अजुनही साक्षर नसल्याने सामाजिक भावनेतून सुज्ञ समाजानेने दिव्यांग शिक्षणाबात सामाजिक चळवळ उभारून दिव्यांग शिक्षणाचे व शिक्षणासाठीच्या सुविधाचे हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन सामाजिक भान जागृत करण्याची आवश्यता आहे .

नव्या सरकारने ही या बाबीकडे लक्ष दिले , कायदा व शासन आदेशाची अमंलबजावाणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने दिव्यांग शिक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली तरच दिव्यांग मुलांची सर्वांगाने उन्नती साधली जाऊ शकते असेही यशवंत ओमासे यांनी सांगितले.

या प्रसंगी जागतिक दिव्यांग दिनी शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे एकमताने ठरवण्यात आले.
आभार दादासो सातपुते यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!