देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; मोदी-शहा आखणार नवी रणनीती
बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे 300 नेते उपस्थित राहणार
देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; मोदी-शहा आखणार नवी रणनीती
बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे 300 नेते उपस्थित राहणार
प्रतिनिधी
देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला होता. मात्र, पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपला धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले होते. अन्य राज्यांमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांचा बदलता कल लक्षात घेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी कोणती नवी रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित असतील. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल यांच्यासह अनेक नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. तर राज्यस्तरावरील भाजप नेते या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेले नाही. सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास ही बैठक सुरु होईल.
बैठकीला कोण उपस्थित राहणार?
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे 300 नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रितपणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधणार आहेत. एकूणच संमेलनाचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असे असणार आहे.