दौंडच्या ग्रामीण भागात सहा नवीन रुग्ण
पाटसमध्ये १० वर्षांच्या मुलीला कोरोना.
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज तालुक्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कातील सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पाटस येथील एका दहा वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून ५७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. पाटस येथील दहा वर्षांची मुलगी व तिचे वडील अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर पाटस येथील एका व्यक्तीचा खासगी लॅबमधील तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीची शासकीय तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. अशोक रासगे यांनी सांगितले.
आज दिवसभरात पाटसमध्ये तीन, पडवी, भांडगाव, देलवडी येथे प्रत्येकी एक असे एकुण सहा नवे कोरोनाबाधीत रूग्ण सापडले आहेत. दरम्यान, दौंड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. तर कौटुंबिक संसर्गात मोठी वा़ढ होत आहे. मागील तीन दिवसात शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात तब्बल ७९ कोरोना बाधित रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये दहा महिन्याच्या बाळापासून ते ९० वर्षाच्या जेष्ठांचा समावेश आहे.