
दौंड: एकाच दिवसात एकाच कुटुंबातील तब्बल चार व्यक्ती कोरोनाबाधित पॉझिटीव्ह सापडल्याने दौंडकरांवर कोरोनाचे सावट पसरले आहे. तत्पुर्वी राज्य राखीव दलातील तीन जवानांना कोरोनाची बाधा झाली होती. आता एकुण सात रूग्णांची संख्या झाल्याने दौंडकरांची झोप उडाली आहे.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी ही माहिती दिल्यानंतर दौंडमध्ये खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून दौंडमध्ये कोरोना बाधित होणं व कोरोनामुक्त होणं हा प्रकार सुरू असतानाच संपर्काशिवाय इतरांना कोरोना होत नाही अशी चर्चा होती. मात्र एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची बाधा होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. कोरोना विषाणूचे सावट दौंडकरांसाठी अधिक भयानक झाले असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 50 जणांची कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आले असून या पन्नास जणांपैकी 7 जणांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 45 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय मुलगी व 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे. याखेरीज मुंबई येथे बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव दलातील तीन जवान देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाले आहेत