दौंड प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधित रुग्णांची लूट.
राष्ट्रवादी अध्यक्षा वैशाली नागवडे आक्रमक, काय आहे नेमका प्रकार जाणून घ्या.
दौंड प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधित रुग्णांची लूट.
राष्ट्रवादी अध्यक्षा वैशाली नागवडे आक्रमक, काय आहे नेमका प्रकार जाणून घ्या.
दौंड मधील कोविड रुग्णांना उपचारासाठी असलेल्या येथील कोविड सेंटर मध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने शहरातील तीन खाजगी दवाखाने ताब्यात घेतलेली आहेत.
या पैकी एका दवाखान्यामध्ये बाधित रुग्णांना भरती केले असता भरमसाठ पैशाची मागणी होत असल्याची घटना समोर आली आहे.
त्यामुळे बाधित रुग्णांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार खर्च द्यावा लागणार की उपचार मोफत होणार यासंबंधी रुग्णांच्या कुटुंबामध्ये संभ्रमावस्था आहे.
त्यातच येथील खाजगी दवाखान्याने रुग्णाच्या नातलगांकडून पैसे घेतल्याची माहिती समोर आल्याने आणखीनच गोंधळ वाढला आहे.
या बाधित रुग्णाच्या मित्रांनी सदरची बाब महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांना कळविली असता, त्यांनी प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खाजगी दवाखान्यामध्ये कोरोनाच्या उपचारासाठी पैसे लागणार नाहीत व खाजगी दवाखान्याने ते घेतले सुद्धा नाही पाहिजे असे सांगितले.
त्यांच्याकडे आलेल्या या तक्रारी नंतर वैशाली नागवडे यांनी तहसीलदार, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, यवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तसेच दौंड पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी यांना कोविड-१९ रुग्णांना(DCHC) हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणेबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, दौंड तालुक्यामध्ये चार खाजगी दवाखाने प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहेत, या ठिकाणी रुग्णांना उपचार होणे अपेक्षित आहे परंतु असे निदर्शनास आले आहे कि, संबंधित खाजगी चार दवाखान्या पैकी केवळ एकच दवाखाना रुग्णांना उपचार देत आहे.
उर्वरित तीन दवाखाने ही काही तांत्रिक अडचणी सांगून रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत दोन रुग्णांच्या तक्रारी सुद्धा प्राप्त आहेत.
तसेच उपजिल्हा रुग्णालय(दौंड) व ग्रामीण रुग्णालय(यवत) ही रुग्णालय शासकीय (DCHC) कार्यान्वित करावीत.
तसेच संबंधित घटनांची माहिती घेऊन याबाबत कोविड-१९ साथरोग अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी वैशाली नागवडे यांनी केली आहे.