धक्कादायक! डॉक्टर्स डेच्या दिवशीच पुण्याच्या डॉक्टर दांपत्याची घरगुती वादातून आत्महत्या
शहरातील वानवडी आझाद नगर येथे एका डॉक्टर दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे.

धक्कादायक! डॉक्टर्स डेच्या दिवशीच पुण्याच्या डॉक्टर दांपत्याची घरगुती वादातून आत्महत्या
शहरातील वानवडी आझाद नगर येथे एका डॉक्टर दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे.
बारामती वार्तापत्र
आज देशभरामध्ये डॉक्टर्स डे साजरा करीत असताना पुण्यातील वानवडी परिसरात राहणार्या डॉक्टर पती, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येनंतर 28 वर्षीय डॉक्टर पतीनेही आयुष्य संपवलं. दोघांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र जागतिक डॉक्टर दिनीच ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
पुणे शहरातील वानवडीमधील आझादनगर परिसरात राहत्या घरात एका पाठोपाठ एक गळफास घेऊन डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली. डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय 26, रा. आजाद नगर, गल्ली नं 2 वानवडी) आणि डॉ. निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 28, रा. आजाद नगर गल्ली नं 2 वानवडी ) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे.
पत्नीचा गळफास, रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू
बुधवार 30 जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास वानवडी पोलिस चौकीचे अंमलदार इनामदार यांना डॉ. अंकिता शेंडकर यांनी वानवडी येथील राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घरातच सकाळी पतीची आत्महत्या
दरम्यान, या घटनेला काहीसा कालावधी लोटत नाही, तोपर्यंतच त्यांचे पती डॉ. निखिल शेंडकर यांनी आज (गुरुवार 1 जुलै) सकाळी सात वाजताच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन केली आत्महत्या केली. दोघांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.