नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना संशयित असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या पार्थिवावर केले अंत्यसंस्कार.
बारामती मध्ये अशाप्रकारे पीपीई किट परिधान करून एका पार्थिवावर अंत्यसंस्कार आला.
नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना संशयित असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या पार्थिवावर केले अंत्यसंस्कार…
बारामती:- वार्ताहर
कोरोना संशयित असल्याच्या कारणाने जेष्ठ नागरिकाच्या मृत्यू नंतर बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. बारामती मध्ये अशाप्रकारे पीपीई किट परिधान करून एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची पहिलीच घटना घडली आहे.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा पुण्याला हलविताना मृत्यू झाला.या व्यक्तीचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी रुई येथील कोविड केअर सेंटर मध्ये घेण्यात आले होते. मात्र त्याच्या अहवालाचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नव्हता, त्यामुळे करोना संशयित म्हणून त्यांची वर्गवारी करण्यात आली होती. त्याचे शवविच्छेदन ही करण्यात आले नाही.
दरम्यान आज बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या चार कर्मचा-यांनी पीपीई किट परिधान करुन संपूर्ण काळजी घेत अमरधाम स्मशानभूमीमध्ये मुख्याधिकारी किरणराज यादव व आरोग्य निरिक्षक सुभाष नारखेडे यांच्या देखरेखीखाली पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. अशा रुग्णांसाठी असलेल्या विशिष्ट बॅगमध्ये मृतदेह ठेवून नंतर अंत्यसंस्कार केले गेले. या नंतर या चारही कर्मचा-यांना सात दिवसांची रजा देण्यात आली असून त्यांनी घरीच राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. आशा कर्मचारी दैनंदिन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार असल्याचे किरणराज यादव यांनी सांगितले.
दरम्यान नगरपालिकेने हे अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांकडून संमतीपत्रक घेऊन तसेच अशा रुग्णाच्या बाबतीत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन ही प्रक्रीया पार पाडली गेली. या अंत्यसंस्कारानंतर अमरधाम स्मशानभूमीचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. संबंधित चार कर्मचा-यांना सात दिवसानंतर पुन्हा तपासून गरज वाटल्यास आणखी सात दिवसांची रजा दिली जाईल, असेही यादव यांनी स्पष्ट केले.