नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य- अंकिता शहा.
पुढील काळात देखील स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य देणार.
नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य- अंकिता शहा.
पुढील काळात देखील स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य देणार.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर नगरपालिकेने देशात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सलग हॅट्रिक संपादन केल्यामुळे इंदापूर शहराच्या वैभवात वाढ झाली आहे याचे श्रेय शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, समाजसेवी संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालय तसेच सन्माननीय नगरपालिकेतील कर्मचारी यांना जाते. स्वच्छतेला इथून पुढे देखील सर्वोत्तम प्राधान्य देणार असल्याचे मत इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी इंदापूर शहराला मानांकन मिळाल्यामुळे आयोजित केलेल्या समारंभामध्ये आपले मत व्यक्त केले.
अंकिता शहा म्हणाल्या कि,’ स्वच्छतेची चळवळ अशीच पुढे चालू ठेवून स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य देऊन नागरिकांच्या सहकार्याने आपण देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू. आपल्याला ही चळवळ निरंतर ठेवून शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावयाचे आहे.’
मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल म्हणाले की,’ स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सर्वांनी चांगले काम केले असून शेवटच्या व्यक्तीपासून ते सर्व पदाधिकारी यांचे योगदान यामध्ये मोठे आहे. ज्या ठिकाणी आपल्याला कमी गुण मिळाले आहेत ते वाढण्यासाठी आपण अधिकचा प्रयत्न करू. सर्व कर्मचारी ,शहरातील नागरिक यांनी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये शंभर टक्के सहभागी होऊन ही चळवळ अधिक पुढे जोमाने नेण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.
पुढील स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अचुक नियोजन, तंत्रशुद्ध माहिती लक्षात घेऊन आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे मत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी या मनोगतामध्ये पुढील स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपल्या कार्याची उत्तम क्षमता दाखवून देशपातळीवर पहिल्या क्रमांकाने येण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक भरत शहा, नगरसेविका मीना ताहीर मोमीन, जावेद शेख, नितीन मखरे, हमीद आत्तार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी केले. आभार श्रद्धा वळवडे यांनी मानले.