नियतीचा जुळ्या भावांवर एकापाठोपाठ घाला.. जन्म आणी मृत्यू एकत्रच…!
13 मे रोजी जोफ्रेडचा मृत्यू झाला, तर काही तासातच 14 मे रोजी राल्फ्रेडची प्राणज्योत मालवली

नियतीचा जुळ्या भावांवर एकापाठोपाठ घाला.. जन्म आणी मृत्यू एकत्रच…!
13 मे रोजी जोफ्रेडचा मृत्यू झाला, तर काही तासातच 14 मे रोजी राल्फ्रेडची प्राणज्योत मालवली
लखनौ :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
एकत्र जन्मलेल्या जुळ्या भावांवर नियतीने एकत्रच घाला घातला. 24 व्या वाढदिवसाला 24 तास उलटत नाहीत, तोच दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आलं. त्यानंतर जोफ्रेड (Joefred Varghese Gregory) आणि राल्फ्रेड या भावांनी एकामागून एक जगाचा निरोप घेतला. तरुण लेकांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील मीरतमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.
23 एप्रिल 1997 रोजी सोजा आणि राफेल या दाम्पत्याच्या पोटी जोफ्रेड आणि राल्फ्रेड या जुळ्या मुलांचा जन्म झाला. जुळी बाळं अगदीच सारखी दिसत असल्याचं राफेल यांना अजूनही आठवतं. जोफ्रेड आणि राल्फ्रेड या दोघांनी आयुष्यात सगळ्याच गोष्टी एकत्र केल्या. शालेय शिक्षणानंतर दोघांनीही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग निवडलं. दोघांनाही हैदराबादमध्येच नोकरीही मिळाली.
“आता राल्फ्रेड एकटा घरी यायचा नाही”
दोघंही आले, तर एकत्रच घरी येतील, किंवा एकही येणार नाही, अशी भीती पिता राफेल यांना सतावत होती. “जे एकासोबत व्हायचं, ते दुसऱ्यासोबतही होत असे. जन्मापासून हे पाहत आलो आहेत. जोफ्रेडच्या निधनाची बातमी ऐकली, तेव्हाच मी बायकोला म्हटलं, आता राल्फ्रेड काय एकटा घरी यायचा नाही” अशी आठवण राफेल गदगदत्या डोळ्यांनी सांगतात. 13 मे रोजी जोफ्रेडचा मृत्यू झाला, तर काही तासातच 14 मे रोजी राल्फ्रेडची प्राणज्योत मालवली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
“आम्ही शिक्षक असल्याने मोठा संघर्ष करुन मुलांचं आयुष्य घडवलं. आमच्या मुलांना आम्हाला सुखासीन आयुष्य द्यायचं होतं. पैशांपासून आनंदापर्यंत सारं काही. कोरियाला जायचा त्यांचा प्लॅन होता. पुढे जर्मनीला जायचंही त्यांच्या डोक्यात होतं. देवाने ही शिक्षा का दिली समजत नाही.” असं राफेल म्हणतात. त्यांना नेल्फ्रेड हा मोठा मुलगा आहे.
सुरुवातीला दोघांवर घरीच उपचार
उत्तर प्रदेशातील मीरत कँटॉनमेंटमध्ये हे कुटुंब राहतं. 24 व्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिलला दोघांना कोरोना संसर्ग झाल्याचं समजलं. सुरुवातीला दोघांवर घरीच उपचार करण्यात आले. मात्र दोघांचाही ताप उतरला नाही. त्यांच ऑक्सिजन लेव्हल 90 वर घसरली होती. डॉक्टरांनी आम्हाला दोघांनाही रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. 1 मे रोजी आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं, असं राफेल यांनी सांगितलं. पहिल्या रिपोर्टनुसार दोघे कोव्हिड पॉझिटिव्ह होते, मात्र दुसरा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह होता.
“डॉक्टरांनी दोघांना कोव्हिड वॉर्डमधून साध्या आयसीयूमध्ये शिफ्ट करण्याचा प्लॅन केला होता. मात्र आणखी दोन दिवस त्यांच्या प्रकृतीची देखरेख करा, अशी विनंती मी केली. अचानक 13 मे रोजी संध्याकाळी माझ्या बायकोला कॉल आला. आमच्या पायाखालची जमीन सरकली” असं राफेल म्हणाले.
जोफ्रेडच्या निधनाची कल्पना राल्फ्रेड आली आणि…
“राल्फ्रेडने त्याच्या आईला अखेरचा फोन केला होता. तो हॉस्पिटल बेडवरुन बोलत होता. त्याचा आवाज चिरत होता. तो म्हणाला आपली तब्येत सुधारत आहे. त्याने जोफ्रेडच्या प्रकृतीची विचारपूस केली. तोपर्यंत जोफ्रेड गेला होता. त्यामुळे आम्ही त्याला खोटंच सांगितलं, की त्याला दिल्लीला रुग्णालयात शिफ्ट करावं लागलं आहे. मात्र राल्फ्रेडला अंदाज आलेला, तो म्हणाला खोटं बोलू नका” असं सांगतानाही राफेल भावविवश झाले.