नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी – हर्षवर्धन पाटील
इंदापूर तालुक्यात वादळी पावसाने नुकसान

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी – हर्षवर्धन पाटील
इंदापूर तालुक्यात वादळी पावसाने नुकसान
इंदापूर:प्रतिनिधी; बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये गुरुवारी (दि. 27) सायंकाळी झालेल्या मान्सून पूर्व वादळी पावसाने केळी, डाळिंब, पेरू आदी फळबागा, विविध शेती पिकांचे व घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 28) केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यामध्ये पिटकेश्वर, निमगाव केतकी, गोतंडी, शेळगांव, अंथुर्णे, हगारवाडी, शिरसाटवाडी, रणगाव, सराफवाडी, जाधववाडी, घोरपडवाडी, वरकुटे खुर्द आदी अनेक गावांच्या परिसरात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या कोरोनाचे संकट शेतकऱ्यांवर असल्याने शेती पिकांना चांगला बाजारभाव मिळत नाही. त्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानाची भर पडली आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे.
त्यामुळे शासनाने फळबागांचे, शेती पिकांचे, घरांच्या पडझडीचे व इतर नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत तात्काळ देणे गरजेचे आहे. पिटकेश्वर येथे पॉलिहाऊसचे नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्याने ठीकठिकाणी विद्युत खांब कोसळले आहेत, अशा ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. दरम्यान, आणखी काही दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.