पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार लढणार का?; अजित पवार म्हणतात…
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार लढणार का?; अजित पवार म्हणतात… पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार लढणार का?; अजित पवार म्हणतात…
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार लढणार का?; अजित पवार म्हणतात…
पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे.
मुंबई :बारामती वार्तापत्र
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मतं विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत.
या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचार-विनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
भारत नाना भालकेंच्या मृत्यूनंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त
दिवंगत आमदार भारत नाना भालके (Bharat Bhalke) यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झालीय. या जागेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर पंढरपूर येथे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाचा आग्रह स्थानिक पातळीवर होताना दिसत आहे. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांनी बाहेरील उमेदवाराला विरोध दर्शवला आहे.