पत्रकार हा समाजमनाचा आरसा : कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे

पत्रकारांचे शहर विकासासाठी महत्वपूर्ण योगदान

पत्रकार हा समाजमनाचा आरसा : कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे

पत्रकारांचे शहर विकासासाठी महत्वपूर्ण योगदान..

इंदापूर प्रतिनिधी –

भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जात असून यामध्ये पत्रकार हे समाजमनाचा आरसा आहेत. पत्रकारांनी जिथे चूक किंवा अन्याय होतो, तिथे जरूर लिहिले पाहिजे. मात्र जिथे चांगले काम होते तिथे कौतुक देखील केले पाहिजे. अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे प्रथम भाग्य मला लाभले, याचा मला खूप आनंद होत आहे मात्र पत्रकार भवन होण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी एक होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा, अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकररावजी पाटील सभागृहात आयोजित पत्रकार दिन विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाच्या दैनंदिन कामा साठी इंदापूर बस स्थानकासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत भाडे तत्त्वावर द्यावी असे निवेदन मंत्री भरणे यांना देण्यात आले. यावेळी मंत्री भरणे यांच्या हस्ते पत्रकार धनंजय कळमकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.

मंत्री भरणे पुढे म्हणाले, मला मिळालेले कॅबिनेट मंत्रीपदाचे श्रेय सर्वसामान्य जनता, पत्रकार व पक्षश्रेष्ठी यांना असून आता तुम्हाला देण्यासाठी माझ्या हातात खूप काही आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकार भवन होण्यासाठी एक होणे गरजेचे आहे. सध्या इंदापूर शहर व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलत आहे. भीमा नदीवरील शिरसोडी ते कुगाव पुलाचे काम जोरात सुरू असून त्यामुळे व्यापार वाढणार आहे. इंदापूर शहरात २०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यामुळे पत्रकारांनी चांगल्या कामाचे कौतुक तर जिथे चुकेल तिथे ते निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. मी बोलण्यापेक्षा काम करणारा कार्यकर्ता आहे. या पत्रकार संघात जुन्या बरोबरच तरुण पत्रकार देखील असून या पत्रकार संघाचे काम चांगले आहे असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, पत्रकारांचे शहर विकासासाठी महत्वपूर्ण योगदान असून नगरपरिषदेच्या मालकीचे सुसज्ज पत्रकार भवन बांधून दिले जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले, पत्रकार भवन साठी नगरपरिषदेने जागा दिल्यास खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पत्रकार भवन साठी संपूर्ण निधी दिला जाईल.

आयएमए चे इंदापूर तालुकाध्यक्ष डॉ. अनिल शिर्के म्हणाले, सर्व पत्रकारांच्या आरोग्या च्या तपासण्या मोफत करून पत्रकारांना योग्य आरोग्य विषयक मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सर्व पत्रकारांच्या अडचणी जाणून घेवून सदर अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विधीज्ञ राहुल मखरे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, विधीज्ञ शुभम निंबाळकर, किरण गानबोटे, पांडुरंग शिंदे, गफुर सय्यद, शकील सय्यद, नंदकुमार गुजर, धरमचंद लोढा, विधीज्ञ गिरीष शहा, अमोलराजे इंगळे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तर युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप यांनी पत्रकारांना पेढे भरविले.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, जेष्ठ पत्रकार तानाजी काळे, महेश स्वामी, विधीज्ञ नारायण ढावरे, कैलास पवार यांनी पत्रकारांच्या विविध अडचणी कडे सर्वांचे लक्ष वेधले.

पत्रकार संघाचे जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, संघटक काकासाहेब मांढरे, सुरेश जकाते, शैलेश काटे, दीपक शिंदे, अंगद तावरे, विजय शिंदे, निलेश भोंग, आदित्य बोराटे, श्रेयश नलवडे, नाना घळकी, रामवर्मा आसबे, दीपक खिलारे, अमोल गुरगुडे, भीमसेन उबाळे, अशोक घोडके, शिवाजी शिंदे, संतोष जामदार, डॉ. सिद्धार्थ सरोदे, मोहंमद कैफ तांबोळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!