पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे सन २००४ च्या आदेशाप्रमाणे भरण्याची राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी
तहसीलदारांना दिले मागणीचे निवेदन

पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे सन २००४ च्या आदेशाप्रमाणे भरण्याची राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी
तहसीलदारांना दिले मागणीचे निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे दि.२५ मे २००४ च्या आदेशाप्रमाणे मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांनाच पदोन्नती देऊन भरण्याची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने केली असून याबाबतचे निवेदन तहसीलदार अनिल ठोंबरे यांना दि.२२ रोजी देण्यात आले.
भारतीय संविधानाच्या कलम १६ मधील १६ (१), १६ (२), १६ (४)अ, १६ (४) क नुसार शासनाला अनुसूचित जाती जमाती,निरअधिसूचित जाती,भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग यांना शासन सेवेतील रिक्त पदांवर आरक्षण देणारा कायदा बनविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.महाराष्ट्र शासनाने सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ हा अनुसूचित जाती-जमाती,निरअधिसूचित जाती,भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग यांना शासन सेवेतील रिक्त पदांवर आरक्षण देणारा कायदा संमत केला आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाकडून संविधानातील कलम १६ च्या तरतुदींना आणि २९/१/२००४ च्या आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासन आदेश निर्गमित करण्यात यावे,याकरिता संघटनेच्या वतीने दि.१२ मार्च २०२१ ला पत्र देण्यात आले व त्या अनुषंगाने शासनाशी चर्चा करण्याकरिता वेळ मागण्यात आली. परंतु शासनाने सदरील पत्रावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न दिल्यामुळे दि.२२ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये व ३५८ तालुक्यांमध्ये काळी फीत बांधून १८ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत असून त्याबाबत निवेदन एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येत आहे.असे निवेदनात म्हंटले असून सदरील आंदोलनाची दखल घेऊन सदरील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी राष्ट्रीय कर्मचारी मूलनिवासी संघाकडून करण्यात आली असून सदर आंदोलनाची व मागणीची दखल न घेतल्यास पुढील टप्प्यातील आंदोलन अत्यंत उग्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हा संयोजक संजय शिंदे, तालुका संयोजक सुरज धाईंजे यांसह नागेश भोसले,रोहित ढावरे,आझाद सय्यद,नितीन देशमाने,अशोक राऊत उपस्थित होते.