पर्यावरणाचे रक्षण आणि उत्तम आरोग्यासाठी शिक्षकांनी सायकलचा वापर करावा- हर्षवर्धन पाटील
इंदापूर महाविद्यालयात आय कॉलेज सायकल क्लबचे उदघाटन

पर्यावरणाचे रक्षण आणि उत्तम आरोग्यासाठी शिक्षकांनी सायकलचा वापर करावा- हर्षवर्धन पाटील
इंदापूर महाविद्यालयात आय कॉलेज सायकल क्लबचे उदघाटन
इंदापूर:प्रतिनिधी
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आय कॉलेज सायकल क्लबचे उदघाटन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते रविवारी ( दि.१२ ) महाविद्यालयात करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.यावेळी संस्थेचे खजिनदार ॲड.मनोहर चौधरी, सचिव प्रा. बाळासाहेब खटके, संचालक तुकाराम जाधव,पराग जाधव उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ पर्यावरणीय रक्षण आणि संभाव्य कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी, आपल्या उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवणे हा महत्वाचा पर्याय आणि गरज निर्माण झाली आहे. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येताना जाताना सायकलचा वापर केला पाहिजे.यामुळे पर्यावरण रक्षण आणि उत्तम आरोग्य राखले जाईल. नव्या पिढीला व्यायामाचे व सायकलचे महत्व या सारख्या उपक्रमातून माहिती होईल. बारामती, भिगवण, बावडा, इंदापूर या ठिकाणी सायकल क्लब स्थापन झाले आहेत. चारशे ते पाचशे व्यक्ती या माध्यमातून दररोज सायकलिंग करत आहेत. इंदापूर महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी रामेश्वर या ठिकाणी सायकलवर गेले आहेत ते तेविशे किलोमीटर सायकल प्रवास करणार आहेत. सायकल चालवणे याकडे लोकांचा कल वाढत असून आय कॉलेज सायकल क्लबच्या माध्यमातून इंदापूर महाविद्यालयातील शिक्षक सायकलिंग करणार आहेत त्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. या वेळी ४० प्राध्यापकांनी दररोज सायकलींचा वापर करण्याचा मनोदय व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.