पवारांच्या बालेकिल्ल्यात राजू शेट्टींची पुन्हा तोप धडाडणार..!
या सभेत ते महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे बारामती, इंदापूरचे लक्ष असणार आहे.
पवारांच्या बालेकिल्ल्यात राजू शेट्टींची पुन्हा तोप धडाडणार..
या सभेत ते महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे बारामती, इंदापूरचे लक्ष असणार आहे.
बारामती वार्तापत्र
महाविकास आघाडीतून काडीमोड घेतल्यानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी आज बारामतीमध्ये येणार आहेत. विशेष म्हणजे ही सभा पवारांचे एकेकाळचे समर्थक आणि सध्या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील ‘छत्रपती’च्या पदाधिकाऱ्यांबरोबर उभा दावा मांडलेले पृथ्वीराज जाचक यांनी आयोजित केली आहे, त्यामुळे एफआरपीच्या मुद्यासह शेतकरी प्रश्नावर शेट्टी कोणता संदेश देतात, याकडे पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय मागील आठवड्यात कोल्हापुरातील पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर केला. त्यावेळी त्यांनी महाआघाडीसह भाजपवर निशाणा साधत ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर फिरून पक्षसंघटना बांधणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले आहे.
कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान संचालक मंडळावर आरोप करत विरोधात आंदोलने केली होती. सध्या जाचक संचालक मंडळाच्या विरोधामध्ये दंड थोपटून आहेत. राजू शेट्टी यांच्या सभेमुळे जाचक यांच्यासह शेतकरी कृती समितीला प्रोत्साहन आणि उभारी मिळणार आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या संचालक मंडळाच्या विरोधकांना बळ मिळणार आहे.
शेट्टी यांच्या सभेच्या नियोजनाची तयारी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून जाचक यांनी करण्यास सुरूवात केली आहे. येत्या बुधवारी (ता. २० एप्रिल) रोजी सायंकाळी सहा वाजता कारखान्याच्या पालखी मैदानावर शेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे.