![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/07/IMG-20200729-WA0040-640x470.jpg)
पाटील भरणे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी.
कोरोना वरून इंदापूरातील राजकारण तापले.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यात गेली काही दिवसांपासून कोरोनाचे संकट गंभीर बनले असून, संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रभावी उपाययोजना होण्याची गरज आहे. मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे गर्दीत सूरपाट्या खेळून व स्वतःचे छायाचित्र असलेले पतंग उडवून सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करीत आहेत. राज्यमंत्र्यांनी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात पोरकटपणाने वागून व स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये,अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.28) प्रसिद्धीपत्रकाद्वारे टिका केली होती.
अशातच आज (दि.29) रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज प्रसिद्धीपत्रक काढून माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यावर जहरी टीका करत प्रतिउत्तर दिले आहे.
कोरोनाच्या काळात तालुक्यातील जनतेला दमडीचीही मदत न करणानाऱ्या विरोधकांनी पुतना मावशीच्या प्रेमा प्रमाणे जनतेविषयी कळवळा आणू नये अशा शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना तालुक्यातील अनेक गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा स्थितीत मागील चार महिन्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावी स्वत: भेट देत गोरगरीब कुटुंबांना आम्ही जीवनोपयोगी अन्नधान्य किटवाटप केले. मात्र ज्या जनतेच्या जोरावर विरोधकांनी वीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केले त्या जनतेला चार महिन्यात कोणत्याही वस्तूचे वाटप विरोधकांनी केले नाही. त्यामुळे विरोधकांना या विषयावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.
स्वतःमध्ये तालुक्यातील गोरगरीब जनतेला जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्याची हिम्मत विरोधकांच्यात नाही. मात्र स्वतःच्या ताब्यात तालुक्यातील अनेक सहकारी संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून तरी गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे वाटप करणे गरजेचे होते. परंतु तेवढे देखील धाडस विरोधकांनी दाखवले नाही, याशिवाय जनता कोरोनाशी लढत असताना विरोधक मात्र आपली विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी दोन महिने मुंबई दिल्लीच्या भाजप नेत्यांकडे वाऱ्या करीत होते.
त्यामुळे त्यांचे तालुक्यातील जनतेविषयी पूतना मावशी प्रमाणे केवळ प्रेम आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
कोरोनाच्या काळात राज्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा स्थितीमध्ये अनेक गावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून १० हजार रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्याचे काम आम्ही केले.
मात्र विरोधकांनी कर्तव्य समजून एका गावात देखील रकतदान शिबिराचे आयोजन केले नाही.
विरोधकांनी विश्रांती घेण्याऐवजी विनाकारण टिका करण्यात वेळ घालवू नये कारण जनतेने मतांच्या जोरावर विरोधकांची कापलेली राजकीय पतंग पुन्हा कधीच आकाशात उडणार नाही याची काळजी घेतली आहे. असे प्रतिउत्तर देत राज्यमंत्री भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील टोला लगावला आहे.