पार्थ पवारांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने; पाटलांचा राष्ट्रवादीला चिमटा
सुशांतसिंह राजपूत, राम मंदिर भूमिपूजनानंतर मराठा आरक्षणावर रोखठोक भूमिका घेणारे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं आहे.
पार्थ पवारांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने; पाटलांचा राष्ट्रवादीला चिमटा
पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिका पाहता, ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने सुरू आहे, असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
बीडमधील विवेक रहाडे या युवकाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली. त्यावर उद्विग्न होऊन पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. मराठा नेत्यांनी वेळीच जागे होऊन आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. राज्य सरकारने हा गुंता सोडविण्यासाठी तातडीने पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणी पार्थ यांनी केली आहे. विवेक यांनी आमच्या मनात पेटवलेली ज्योत व्यवस्थेला पेटवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बाबत विचारणा केली असता पाटील यांनी पार्थ पवार हे ‘सत्यमेव जयते’च्या मार्गावर असल्याचे मत व्यक्त केले. पार्थ पवार यांनी यापूर्वीही सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यामुळे ते आतल्या आवाजाला अधिक महत्त्व देतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.