पालखीमार्गाला अडथळा ठरणारी इमारत 75 फूट अंतरावर सरकवण्याचा यशस्वी प्रयोग
तीन मजली इमारत दुसऱ्या जागेवर नेण्याकरिता तीन महिन्यांचा कालावधी लागणार..

पालखीमार्गाला अडथळा ठरणारी इमारत 75 फूट अंतरावर सरकवण्याचा यशस्वी प्रयोग
तीन मजली इमारत दुसऱ्या जागेवर नेण्याकरिता तीन महिन्यांचा कालावधी लागणार..
इंदापूर प्रतिनिधी –
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला अडसर असलेली तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटांची इमारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्याचा प्रयोग होत आहे. हा प्रयोग निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील सुरेश म्हेत्रे व संजय म्हेत्रे करत आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी काटेवाडी (ता. बारामती) भागातच संत तुकाराम महाराज पालखीमार्गाला हसन व अकबर मुलाणींची जुनी इमारत अडथळा ठरली होती. ही तीन हजार चौरस फुटांची दोन मजली इमारत दोनशे जॅक व चॅनलच्या मदतीने दहा फूट मागे सरकवण्यात आली. जिल्ह्यात इमारत सरकवण्याच्या प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, २३ बाय ४३ फूट आकाराची इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च होणार आहे. हे काम हरियाणामधील पानिपत येथील ठेकेदार मोहनलाल दरसाल यांना देण्यात आलेले आहे. ही तीन मजली असलेली इमारत दुसऱ्या जागेवर नेण्याकरिता तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तसेच, ही इमारत हलवताना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याचे व इतर सर्व व्यवहाराचे संबंधित ठेकेदाराने स्टॅम्प पेपरवर करार करून दिलेले आहेत. ही बिल्डिंग जॅक व चॅनलच्या साहाय्याने चार फूट उंच उचलून जागेवरून हलवण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांमध्ये तीस फूट हलवण्यात आली असून, हे आश्चर्य पाहण्यासाठी गावातील नागरिक गर्दी करत आहेत. ही इमारत मूळ जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी ५० कामगार कार्यरत असून, २५० जॅकच्या साहाय्याने इमारत सरकवत आहेत.
ही इमारत उचलण्यासाठी स्क्वेअर फुटाला दोनशे रुपये व पुढे सरकवण्यासाठी पाचशे रुपये खर्च असून, ही इमारत सरकवण्याचा प्रयोग येथील नागरिकांचा कुतूहलाचा विषय ठरला आहे.