पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन
उत्तम व्यंगचित्रकार म्हणून सरग यांची ओळख

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन
उत्तम व्यंगचित्रकार म्हणून सरग यांची ओळख
पुणे :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
पुण्यात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. आता पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. सरग यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मागील आठवड्यात लक्षणे दिसू लागल्याने कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावतच होती. अखेर आज पहाटे त्यांचे निधन झाले.
उत्तम व्यंगचित्रकार म्हणून सरग यांची ओळख
राजेंद्र सरग हे महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्रात एक मनमिळावू आणि आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. ते उत्तम व्यंगचित्रकार देखील होते. पुणे जिल्ह्यात अनेक वर्षे माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. राजेंद्र सरग यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड, अहमदनगर, परभणी, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. त्यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचा छंद होता. ते अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिकांना व महाराष्ट्रातील दिवाळी अंकांना मोफत व्यंगचित्र देत होते. त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
पुढच्याच आठवड्यात होणार होते प्रमोशन
राजेंद्र सरग यांचा कोरोनाशी लढताना अखेर आज त्यांचा मृत्यू झाला. दुःखाची बाब म्हणजे पुढच्याच आठवड्यात त्यांचे प्रमोशन होणार होते. त्यांच्या या जाण्याने कुटुंबावर दुःख कोसळले आहे. राजेंद्र सरग यांच्या निधनाने एक चांगला अधिकारी गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.