पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात;तिघांचा मृत्यू तर दोन जखमी..
इंदापूर तालुक्यातील डाळज नं.२ येथील घटना
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात;तिघांचा मृत्यू तर दोन जखमी..
इंदापूर तालुक्यातील डाळज नं.२ येथील घटना
बारामती वार्तापत्र
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज नं.2 च्या हद्दीत फॉर्च्यूनर व ट्रॅक्टर चा अपघात झाला असून या अपघातात फॉर्च्यूनर मधील तिघांचा मृत्यू झाला आहे. दि.०७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून गीता अरूण माने (वय ३६ वर्षे),मुकुंद अरुण माने (वय २५ वर्षे) अरुण बाबुराव माने (वय ४५ वर्षे) सर्व रा.लातूर जिल्हा-लातूर अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नांवे असून साक्षी अरुण माने (वय १८ वर्षे)व महादेव रखमाजी नेटके (वय ५६वर्षे) हे जखमी आहेत.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. ०७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टर नं एम.एच ४५ एफ ७७७९ व दोन ट्रेलर मौजे केत्तुर येथून ट्रॉलीमध्ये ऊस भरून माळीनगर साखर कारखाना येथे घेवून जात असताना मौजे डाळज नं २ गावचे हद्दीत पुणे – सोलापूर हायवे रोडवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या फॉर्च्यूनर (गाडी नं.- एम.एच.२४ ए.टी २००४) हीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर च्या मागील ट्रॉलीस जोरदार धडक दिली.
हा आपघात इतका गंभीर होता की यात गीता अरूण माने,मुकुंद अरुण माने व अरुण बाबुराव माने यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर साक्षी अरुण माने व चालक महादेव रखमाजी नेटके हे जखमी झाले आहेत.वाहनाचे ही प्रचंड नुकसान झाले असून याबाबत ट्रॅक्टर चालक गोरख मल्हारी बिडबाग (वय ६० वर्षे) रा.संग्रामनगर अकलूज ता – माळशिरस जि.सोलापूर यांनी भिगवण पोलिसांत खबर दिली आहे.पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरिक्षक सुभाष रुपणवर
करीत आहेत.
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून होणारी ऊस वाहतूक हा गंभीर प्रश्न असून, याकडे पोलीस प्रशासन, हायवे प्रशासन आणि परिवहन विभाग गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपघातात आपले जीव गमवावे लागत आहेत. या ऊस वाहतूक चालकांच्या चुकीमुळे अनेक संसार उघडे पडत आहेत. कर्णकर्कश आवाजात चालणारे टेप, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये लागलेली शर्यत, विना रिफ्लेक्टर केली जात असणारी ऊस, मळी आणि भुसा वाहतूक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिसूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. याकडे संबंधित प्रशासनाने गांभीयनि लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.