पुन्हा बिघडली; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, श्वास घेण्यास त्रास, व्हेंटिलेटरवर ठेवले
गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुन्हा बिघडली; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, श्वास घेण्यास त्रास, व्हेंटिलेटरवर ठेवले
गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई : प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लतादीदींना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी, उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात ‘प्रभू कुंज’ जवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते. काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी निवेदन दिलं होतं. लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही. ती गोपनीय बाबतीत थेट घुसखोरी होईल. कृपया प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका, असं निवेदनात म्हटलं होतं.