पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेळावा अविस्मरणीय ठरला.

पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेळावा अविस्मरणीय ठरला.
इंदापूर; प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. महाविद्यालयाच्या परिसरात जुन्या आठवणींना उजाळा देत, विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांना पुन्हा एकदा ताजे केले.
मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या काळातील आठवणी ताज्या करत महाविद्यालयाने दिलेल्या ज्ञानामुळे त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या सकारात्मक बदलांविषयी गौरवोद्गार काढले.
महाविद्यालयातील तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सरस असल्याचे अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी विशेषतः कार्यशाळेतील (वर्कशॉप) उत्कृष्ट सुविधा, प्रॅक्टिकलला दिले जाणारे महत्त्व आणि प्राध्यापक व स्टाफच्या तळमळीचे कौतुक केले. महाविद्यालयातील शिक्षणामुळे उद्योग, उच्च शिक्षण संस्थांमध्ये आपली ओळख निर्माण करणे सोपे झाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघटना सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ यांनी मागील हिशोबाचा लेखाजोखा मांडला. सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी तर स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयात ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर, इनक्यूबेशन सेंटर, जर्मन भाषा प्रशिक्षण कार्यक्रम, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, सायबर सिक्युरिटी सेंटर यांसारख्या तांत्रिक व कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य देशपांडे पुढे म्हणाले, “महाविद्यालय नऊ ते पाच या वेळेत सुरू असते, मात्र भविष्यात हे २४ तास चालू राहील अशा प्रकारे विविध तांत्रिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. या माध्यमातून महाविद्यालयातून समाजोपयोगी, राष्ट्रोपयोगी संशोधन व प्रकल्प तयार होतील.”
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक लवकरच एनबीए मानांकनासाठी तयारी करत असून, त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महाविद्यालयाला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी संपूर्ण शिक्षकवृंदांचे आणि व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.
माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेळावा अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या भाषणांनंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपापल्या क्षेत्रांत उच्च स्थान मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी मदतीचे आश्वासन दिले. या अनौपचारिक गप्पांमध्ये अनेक नव्या कल्पनांचा विचार झाला.
या भव्य मेळाव्यामुळे विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज आणि माजी विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ झाले. भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन अधिक मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.