
५० वर्षानंतर वर्धमान विद्यालयात दहावी चा वर्ग भरला.
९ माजी गुरुजन आवर्जून उपस्थित
बारामती वार्तापत्र
दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी, श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर या शाळेत सन ७४-७५ च्या प्रथम दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गरूजनांप्रती व शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते.
शाळेच्या हॉलच्या सुशोभीकरणाच्या खर्चाचा भार उचलत, एक आगळावेगळ्या पद्धतीने सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा केला. या कार्यक्रमासाठी लांबून म्हणजे अगदी नाशिक, बारामती, इंदापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई, बडोदा व अंकलेश्वर या शहरांमधून सुमारे ८० माजी विद्यार्थी- विद्यार्थ्यीनी आणि या बॅचला शिकवणाऱ्या गुरुजनांपैकी ९ माजी गुरुजन आवर्जून उपस्थित राहिले होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थितांची नावनोंदणी व चहा,नाश्ता देण्यात आला.
कार्यक्रमाची सूरूवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त व वालचंद शेठ यांचे प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर शालेय प्रार्थना आणि राज्यगीत सर्वांनी सामुहिक गायले.नंतर स्नेहमेळावा संयोजन समिती अध्यक्ष श्री दिलीप पालवे यांनी सविस्तर प्रास्ताविक केलं.
हा स्नेहमेळावा करण्यापाठीमागची भूमिका व त्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाची सविस्तर माहिती श्री पालवे यांनी विशद केली. त्यांनी शाळेच्या गेल्या ९० वर्षात अनेक नामवंत, बुद्धिमान विद्यार्थी हे शाळेची बौद्धिक संपदा असून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना होण्यासाठी आंम्ही प्रयत्न करू असे सांगितले.
शहाजी कांबळे यांनी या १९७५ चे बॅचमधील दिवंगत विद्यार्थी आणि तत्कालीन ज्ञानदान केलेल्या दिवंगत शिक्षकांची यादी वाचन केल्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते, श्री माळवदकर सर, सौ माळवदकर मॅडम, श्री सावंत सर, श्री खेडकर सर, श्री साळुंखे सर, श्री एस व्ही कुलकर्णी सर, सौ.घोडके मॅडम, श्री बोकील सर, सौ बोकील मॅडम या गुरुजनांचा व शाळेचे प्राचार्य श्री कुंभार सर, शाळा समितीचे अध्यक्ष श्री मकरंद वाघ यांचा शाल श्रीफळ , सन्मानचिन्ह आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यी शहाजी कांबळे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाची प्रत देऊन सन्मान केला. माजी विद्यार्थ्यांनी सत्यभामा भापकर देवकर हिने पतीचे निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीवर धैर्य व कष्टाने मात करून दोन्ही मुलांना शिक्षक केले याबद्दल तिचा सन्मान सौ. सुनंदा माळवदकर मॅडम यांचे हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री माननीय श्री दत्तामामा भरणे कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले होते , त्यांचे स्वागत व सत्कार दिलीप पालवे यांनी केला व नंतर त्यांच्या शुभहस्ते ‘सुवर्णवेध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमहोदयांनी मनोगत व्यक्त करून सर्व माजी विद्यार्थी व गुरूजनांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या भाषणात ते म्हणाले, “ पन्नास वर्षानंतर देखील तुम्हा विद्यार्थ्यांना शाळेविषयी असलेलं प्रेम व कृतज्ञता व्यक्त करीत आहात, तसेच शाळेच्या हॉलच्या सुशोभीकरणाचं केलेलं भरीव काम बघून मी प्रभावित झालो आहे. शाळेसाठी असाच लोभ असू द्या.” या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय सांगून मनोगत व्यक्त केलं. *या मध्दे एकमेव माजी विद्यार्थी जो याच विद्यालयात शिक्षकही होता त्या श्री सिकंदर जमादार यांनी सांगीतलेल्या आठवणीने सर्व भारावुन गेले होते.
या माजी सर्व विद्यार्थ्यांचा मा.शिक्षकांच्या हस्ते सन्मानचिन्ह व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर उपस्थित सर्व माजी शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
‘सर्व माजी विद्यार्थ्यांना बघून त्यांच्या त्यावेळच्या खोडकरपणाच्या आठवणी जागा झाल्या. बहुतांश विद्यार्थ्यांची कर्तृत्व गाथा ऐकून आणि वाचून खूप आनंद झाला. तुम्ही सर्व विद्यार्थी पासष्टीत आहात पण अजूनही तुम्ही तुमच्या शाळेला आणि तुमच्या शिक्षकांना विसरला नाही, त्यांना आठवणींनं आमंत्रित केलंत हे बघून आमचं मन भरुन आलं.’ अशी कृतकृत्यतेची भावना सर्व शिक्षकांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केली.
माजी विद्यार्थी श्री शितल शहा यांनी सर्वांना त्यांचे रिदम ॲटो, हिंजवडी पुणे वतीने सन्मानचिन्ह व शाळेला वॅाटर कुलर भेट दिला. श्री अनिल कस्तुरे यांनी सर्वांना गुलाबफूल , नाष्टा व चहा देऊन स्वागत केले.
तसेच सौ. जयश्री पोतदार यांनी सातारा येथील प्रसिद्ध कंदी पेढे सर्वांना देवून तोंड गोड केले. मनोरमा कुळकर्णी यांनी स्वतः नक्षीकाम केलेल्या साड्या सर्व शिक्षिकांना देऊन सन्मान केला. दिलीप पालवे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त त्यांची पुस्तके देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
सर्व शिक्षकांची मनोगते झाल्यानंतर सौ जयश्री पोतदार यांनी आभार प्रदर्शन केलं.
डॉ. सौ जयश्री महावीर गांधी यांनी या कार्यक्रमाचं अत्यंत समर्पक शब्दांत आणि ओघवत्या भाषेत सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमानंतर भोजन सोहळा झाला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांपैकी काहींनी गाणी, कविता, विडंबनात्मक कविता असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या व जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेच्या प्रांगणात गुरूजनांसोबत ग्रुप फोटो काढला.
आमच्या मैत्रीच्या जीवनात एक नवीन अध्याय निर्माण झाला व येणाऱ्या काळात मैत्री अधिक दृढ होईल व उर्वरित आयुष्य एकमेकांच्या सहकार्याने,सौजन्याने व आधाराने पुढे पुढे आनंदाने जात राहील याची खात्री देत,
या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या आठवणी मनात ठेवून पुन्हा भेटण्याच्या आश्वासनाने सर्वजण मार्गस्थ झाले.