प्रहार जनशक्ती पक्षाचा इंदापूर तालुक्यातील अवैद्य धंद्यांवर प्रहार
तालुका दंडाधिकाऱ्यांनी दिले पोलीस निरीक्षकांकडे कारवाई करण्यासंदर्भात पत्र

प्रहार जनशक्ती पक्षाचा इंदापूर तालुक्यातील अवैद्य धंद्यांवर प्रहार
तालुका दंडाधिकाऱ्यांनी दिले पोलीस निरीक्षकांकडे कारवाई करण्यासंदर्भात पत्र
बारामती वार्तापत्र
संपूर्ण जग आणि देशांमध्ये कोविड-19 च्या महामारीने थैमान घातलेले असताना इंदापूर तालुक्यांमध्ये अवैध धंद्यांचे पेव फुटलेले आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे तालुक्यातील अवैद्य धंदेवाल्यांची फावले आहे. दारू, जुगार,मटका, क्लब, वाळू उपसा व वाहतूक या माध्यमातून अनेक सामाजिक तत्वे शासनाची व समाजाची लूट करत आहेत.
अवैद्य दारू मुळे अनेकांचे प्रपंच देशोधडीला लागले आहेत तर जुगारामुळे कर्जबाजारीपणा आला आहे तर उजनी धरणातील वाळूवर डल्ला मारून पर्यावरणाचे पर्यायाने शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्याचा उद्योग जोरात सुरू आहे.याकडे प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसते.
इंदापूर तालुक्यातील अवैध वाळू,दारू विक्री,जुगार,क्लब, मटका बंद करण्यात यावा अन्यथा अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात आला असून अशा आशयाचे पत्र प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी इंदापूर शहराध्यक्ष अनिल मोहिते, तालुका उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के, प्रहार शेतकरी संघटनेचे अशोक शिंदे, तालुकाध्यक्ष संजय राऊत, भटक्या विमुक्तांचे नेते तानाजीराव धोत्रे,प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडोळे,प्रहार अपंग क्रांती संस्थेचे शहराध्यक्ष दीपक आरडे,बाळासाहेब लोखंडे, आप्पासाहेब आरडे, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी पोलीस निरीक्षक इंदापूर यांना इंदापूर तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करणेबाबत लेखी पत्र दिले आहे.