प्राथमिक आरोग्य केंद्र , माळेगाव बु. व पणदरे येथील नवीन इमारतीचे उद्धाटन
दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबध्द उपमुख्यमंत्री अजित पवार
प्राथमिक आरोग्य केंद्र , माळेगाव बु. व पणदरे येथील नवीन इमारतीचे उद्धाटन
दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबध्द
उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती वार्तापत्र
शहरी तसेच ग्रामीण भागातही मोठया प्रमाणात आजार वाढत असून कोरोनासारख्या आजाराचे आव्हान आपल्यासमोर आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यामातून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटिबध्द असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. आरोग्य विषयक सुविधामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नसल्याचेही त्यांनी स्पट केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र , माळेगाव बु. व प्राथमिक आरोग्य केंद्र पणदरे येथील नवीन इमारतीचे उद्धाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री दतात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, बारामती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारावकर, जिल्हा परिषदेच्या सदस्य रोहिणी तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य शासन आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून दर्जेदार प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती व या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. माळेगाव व पणदरे आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना निश्चितपणे आरोग्य विषयक सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त करताना आरोग्य केंद्राची इमारत व परिसर नियमीत निर्जंतुकीकरण करा तसेच स्वच्छता ठेवा, परिसरात झाडे लावा व त्यांचे संवर्धन करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बारामती व परिसराच्या संर्वागिण विकासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती व परिसरातील अनेक गावात याच धर्तीवर आरोग्य सेवेसोबतच विकास कामावर आपला भर आहे. पणदरे ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. पणदरे प्रमाणेच प्रत्येक गावात उपलब्ध जागेत याच धर्तीवर विकास कामे उभी करता येतील त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. आपण या विकासकामांसाठी सर्वोपतरी सहकार्य करु असेही त्यांनी सांगितले. तसेच माळेगाव बु. येथील रमामाता नगर येथे समाजमंदीराचे उद्घाटन व नव्याने उभारण्यात येणा-या पोलीस स्टेशनच्या जागेची पाहणीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
यावेळी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.