प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक
रमेश ढगे यांचे मत ; इंदापूरात प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती

प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक
रमेश ढगे यांचे मत ; इंदापूरात प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती
इंदापूर प्रतिनिधी –
वाढत्या प्लॅस्टिक वापरामुळे सध्या प्रदूषण वाढत आहे. यातून निसर्गाचा समतोल ढासळत चालला असून, वाढता प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक आहे. यामुळे सर्वांनी प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक कागदी किंवा कापडी पिशव्या वापरणे आवश्यक आहे,” असे आवाहन इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले.
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत इंदापूर नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने प्लॅस्टिक बंदी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. याबाबत माहिती देताना ढगे बोलत होते. या उपक्रमांतर्गत मकरसंक्रांती सणाचे औचित्य साधून ओवसायला आलेल्यामहिलांना कापडी पिशवी देऊन संस्कृती सोबत निसर्गाचे देखील संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कापडी पिशव्यांवर आपले इंदापूर प्लॅस्टिकमुक्त अशा प्रकारचा आशय लिहिला आहे. या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनीमंदिराच्या ठिकाणी मकरसंक्रांतीनिमित्त ओवसण्यास आलेल्या महिलांमध्ये पिशव्या वाटप करीत जनजागृती केली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद देशमुख, सुभाष ओहोळ, अल्ताफ पठाण, तुषार मखरे, अरुण शिंदे, शुभांगी सुतार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.