बनावट दागिने तारण ठेवून सराफाची फसवणूक
महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल

बनावट दागिने तारण ठेवून सराफाची फसवणूक
महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील सराफ व्यवसाय करणाऱ्या महिलेला शहरातीलच एका महिलेने बनावट दागिने सोन्याचे असल्याचे भासवून तब्बल 2 लाख 40 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात सविता विजय शिंदे (वय 40, रा. इंदापूर) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत गौरी संजय पवार (वय 42, व्यवसाय सराफ दुकान, रा. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील खडकपुरा येथील फिर्यादीच्या ‘अयोध्या ज्वेलर्स’ नावाच्या दुकानात सविता विजय शिंदे या महिलेने विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिच्याकडील खोटे दागिने सोन्याचे असल्याचे भासवून ते फिर्यादीकडे तारण ठेवून त्या बदल्यात एकूण 2 लाख 40 हजार रुपये घेऊन गेली. यामध्ये 1 लाख 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 2 तोळे वजनाच्या दोन हातातील सोन्याच्या बांगड्या असल्याचे सांगितले. मात्र, ते बनावट असल्याने 21 मार्च रोजी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार तांबे करत आहेत.