बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने इंदापूर तहसील कचेरीवर महिला बचत गट व मायक्रो फायनान्स कर्ज माफीसाठी आंदोलन
हजारो महिलांचा आंदोलनात सहभाग
बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने इंदापूर तहसील कचेरीवर महिला बचत गट व मायक्रो फायनान्स कर्ज माफीसाठी आंदोलन
हजारो महिलांचा आंदोलनात सहभाग
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कोरोना महामारी ने नागरिक त्रस्त झाले असताना महाराष्ट्रातील जनतेला मायक्रो फायनान्स कंपन्या हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहेत. फायनान्स चे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न महिलांसमोर असल्याने बहुजन मुक्ती पार्टी ने राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने मोठ्या उद्योगपतींचे 68 हजार कोटींचे कर्ज माफ केले त्या पद्धतीने या सामान्य वर्गातील महिलांचे कर्ज माफ करावे आणि जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तोपर्यंत फायनान्स कर्ज वसुली थांबवण्यात यावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला आघाडी प्रमुख अँड. सुजाता चौंदते यांच्या सूचनेनुसार आज इंदापूर शहरातील प्रशासकीय भवन समोर महिलांनी आंदोलन केले.
यावेळी बोलताना बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी धनदांडग्यांचे हजारो करोड रुपये सरकारने कर्जमाफी केली मात्र रोजीरोटीसाठी धडपडणाऱ्या गोरगरीब जनतेची, महिलांची सरकारला काळजी नाही. गोर-गरीब जनतेने छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेतले होते मात्र सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे रोजगार गेले,व्यवसाय अडचणीत आले त्यामुळे कर्ज फेडणे अवघड झाले आहे. त्यामुळे महिला बचत गट व मायक्रो फायनान्सचे कर्ज सरकारने त्वरित माफ करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फायनान्स हप्ते भरू न शकल्याने महिलांनी आपले जीवन संपवल्याने त्यांचा प्रपंच उघड्यावर पडला असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले.
तसेच यावेळी अनेक महिलांनी त्यांच्या व्यथा मांडत दुःख व्यक्त करून या बाबतचे निवेदन नायब तहसिलदार शुभांगी अभंगराव यांच्या कडे सुपूर्द केले.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य काकासाहेब जाधव, भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण,मौर्य क्रांति संघ महाराष्ट्र राज्य संघटक राहुल शिंगाडे, भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, भारतीय युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष सुरज धाईंजे, बामसेफ इंदापूर तालुका कार्यकारी अध्यक्ष अँड.किरण लोंढे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.