बांधकाम कामगार मोफत लसीकरण मोहिमेचा उपमुखमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
बारामती तालुक्यात 1200 इमारत व इतर नोंदणीकृत कामगार आहेत

बांधकाम कामगार मोफत लसीकरण मोहिमेचा उपमुखमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
बारामती तालुक्यात 1200 इमारत व इतर नोंदणीकृत कामगार आहेत
बारामती वार्तापत्र
कामगार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र शासन, क्रेडाई महाराष्ट्र व क्रेडाई बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी आयोजित मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अप्पर कामगार आयुक्त शैलैश पोळ, कामगार उपायुक्त अभय गिते, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनिल फुरडे, उपध्यक्ष प्रफुल्ल तावरे, क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले , हा एक स्तुत उपक्रम असून त्यामुळे कामगार बांधवांना लसीकरणाचा लाभ घेता येईल. उपजिविकेचे साधन शोधत बाहेरील राज्यातील कामगार इकडे येत असतात. त्यांना या उपक्रमामुळे कोरोनापासून संरक्षण मिळविता येईल. मागील वर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत कामगारांना शासनातर्फे मदत देण्यात आली. कामगारांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. कामगारांमुळेच विकासाला गती देणे शक्य होते. कोणीही कामगार लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. सर्वच कामगारांनी दोन डोस घ्यायला हवे. बारामती तालुक्यात लसीकरणावर सध्या भर देण्यात येत आहे.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीचे दोन्हीही डोस घेणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात लसीकरण 1 कोटीच्या पुढे झाले आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्क वापरावा, सामाजिक अंतर राखावे, वारंवार हात धुवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कामगार आयुक्त जाधव म्हणाले, बारामती तालुक्यात 1200 इमारत व इतर नोंदणीकृत कामगार आहेत. कामगारांच्या लसीकरणाची मोहिम ही बारामतीतून सुरू होत असून ती आता सर्व राज्यभर राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिम सफल करण्यासाठी ‘डॉक्टर फॉर यु’ संस्थेने सहकार्य केल्याबद्दल त्यांनी संस्थेला धन्यवाद दिले.
सर्वांचे सहकार्य भेटल्यास कामगारांचे लसीकरण लवकर होईल असा विश्वास व्यक्त करून ही मोहिम 61 शहरात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री.फुरडे यांनी दिली. दोन हजार कामगारांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्री.भोईटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर फॉर यु टिम, वैद्यकीय कर्मचारी, सचिव क्रेडाई बारामती राहूल खाटमोडे, क्रेडाई बारामतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, बांधकाम कामगार उपस्थित होते.