बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी लांबणीवर; ‘हा’ वाद मुख्यमंत्र्यांनी टाळला,
हा कार्यक्रम आता नवी तारीख निश्चित करून पूर्ण नियोजनाअंती होणार आहे.
बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी लांबणीवर; ‘हा’ वाद मुख्यमंत्र्यांनी टाळला.
हा कार्यक्रम आता नवी तारीख निश्चित करून पूर्ण नियोजनाअंती होणार आहे.
मुंबई: बारामती वार्तापत्र रिपोर्ट.
दादरच्या इंदू मिल येथे होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज अचानक पुढे ढकलण्यात आल्याने त्यावर अनेक तर्क लावले जात असताना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाला मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेतला जात होता. त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. हा कार्यक्रम आता नवी तारीख निश्चित करून पूर्ण नियोजनाअंती होणार आहे.
‘इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर एमएमआरडीएने पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले होते, मात्र अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश मी दिले आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे नमूद केले आहे.
दरम्यान, २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या स्मारकात बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा राहणार असून या पुतळ्याचा पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केवळ १६ मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातीलही काही सदस्यांना आमंत्रण दिले गेले नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी त्यावरून मंत्रिमंडळात नाराजीचा सूर होता. या सर्वाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आजचा कार्यक्रम पुढे ढकलून मोठा वाद टाळला आहे.