
बारामतीकरांनो सावधान.
एकाच दिवशी सापडले कोरोनाचे ९ नवे रुग्ण.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार या कडे सर्वांचे लक्ष
बारामती:-प्रतिनिधी
आज दि.१२ जुलै रोजी शहरात एकाच दिवशी कोरोनाचे नऊ रुग्ण सापडल्याने आता बारामतीकरांचे धाबे दणाणले आहेत. वसंतनगर मधील परिचारिकेच्या संपर्कातील पाच जण कोरोनाबाधित असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
दरम्यान बारामती शहरातील गुनवडी चौकातील शाहू कॉम्प्लेक्समधील एक दुकानदार, रुई येथील एक ग्रामस्थ तसेच श्रीरामनगरमधील एक नागरिक आणि जेबीएस टाऊनशीपमधील एक असे एकूण नऊ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आज निष्पन्न झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढू लागल्याने आता चिंतेची स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. कालपर्यंत बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ४० वर पोहोचली होती आज हीच संख्या आता ४९ पर्यंत जाऊन पोहोचली. या पैकी चार जणांचा मृत्यू झाला असून २२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
बारामतीतील निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिक बिनधास्तपणे शहरात विनामास्क फिरताना दिसत होते, सोशल डिस्टन्सिंगसह इतरही निर्बंध फारसे कोणी पाळत नसल्याचेच चित्र होते. आता आज एकाच दिवशी नऊ रुग्ण सापडल्याने बारामतीचे प्रशासन व उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष आहे.
बारामती कोरोनामुक्त झाली आहे, असे वाटत असतानाच ज्यांना कोरोना होतो आहे त्यांच्या संपर्कातील लोकही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होत आहे. काही जणांना मुंबईच्या प्रवासाचा इतिहास आहे, त्यामुळेही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.