बारामतीचे दोन ‘ हिरे ‘चमकतात तेव्हा
बारामतीकर जनतेने मानले आभार
बारामती वार्तापत्र
हीरा म्हटलं की त्याला किंमत आलीच, पण बारामतीत असे दोन हिरे होते ते कधीही प्रकाश झोतात आले नाहीत. कायम पडद्याच्या पाठी मागे राहून ,कुठल्याही प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पुढे न येणाऱ्या बारामतीतील दोन डॉक्टरांचा आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कोरोना चा सामना करण्यासाठी मागील आठ महिन्याच्या कालावधीत समस्त बारामती तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मदतीची भावना असणारे डॉक्टर काम करत होते त्यामध्ये बारामतीच्या सिल्वर जुबली रुग्णालयातील डॉक्टर महेश जगताप व मागील अनेक वर्षांपासून बारामती शहरात छातीच्या विकारां संबंधी, श्वसन विकार संबंधित रुग्णांना उपचार करत असलेले बारामतीतील डॉक्टर हर्षवर्धन होरा या दोन डॉक्टरांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अशोक तांबे यांनी याविषयीची माहिती दिली. कोरोना संक्रमणाच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. तसेच नागरिकांची बिघडलेली आरोग्य स्थिती व करून विषयी कुटुंबांमध्ये असलेला गैरसमज, त्यातून रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून महेश जगताप यांनी कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची जागृती करून घाबरू नका काळजी घ्या असा सामान्य नागरिकाला आधार दिला. त्याचबरोबर खाजगी प्रॅक्टिस करत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून डॉक्टर हर्षवर्धन होरा यांनीही रुग्णांच्या श्वसनसंस्था व ऑक्सिजनचे महत्व यातील महत्त्वाच्या आरोग्य विषयक बाबी जनतेसमोर आणल्या. त्यामुळे अनेक गैरसमज टळले कोरोना निर्मूलनाचा बारामती पॅटर्न संपूर्ण राज्यात नावारूपाला आला. त्याच बारामतीतील डॉक्टरांचा आज प्रतिनिधिक सन्मान करण्यात आला.