
बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब जाधव यांची निवड
रिक्त झालेल्या जागेवर जाधव यांची निवड
बारामती वार्तापत्र
बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांची आज निवड झाली. उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर जाधव यांची निवड करण्यात आली.
बारामती नगरपालिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, आज नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्षपदी बाळासाहेब जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
स्थायी समितीची निवड व उपनगराध्यक्ष पदाची निवड यामध्ये संधी मिळालेले सदस्य हे सत्ताधारी पक्षातील एकाच गटाचे असल्याने नगरपालिकेत एकच गट तुल्यबळ ठरला असल्याची चर्चा बारामती शहरात रंगू लागली आहे.
यावेळी नगराध्यक्षा तावरे यांच्यासह मावळत्या उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.