गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली
मुंबई : प्रतिनिधी
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
मल्टी-ऑर्गन फेल्युअरने निधन
रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. कोव्हिडची लागण झाल्यापासून 28 दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
प्रभुकुंजवर अंत्यदर्शन, शिवतीर्थावर अंत्यसंस्कार
मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. लता मंगेशकर यांच्या पश्चात तीन भगिनी – प्रख्यात गायिका आशा भोसले, संगीतकार मीना खडीकर, गायिका उषा मंगेशकर, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत.
महिनाभरापासून उपचार
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. त्याआधी लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि प्रख्यात गायिका आशा भोसले, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शनिवारी रात्री भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रद्धा कपूर, पियुष गोयल यांनीही रुग्णालयात भेट दिली होती.