बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या १६ वर.
बारामतीमध्ये दुध संघ वसाहत परिसरातील एका २९ वर्षाच्या तरुणाला कोरोणाची लागण झाली
बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या १६ वर शहरातील दुधसंघ वसाहतीत राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण .
शहरातील दूध संघ वसाहत हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला.
बारामती : शहरातील भिगवण रस्त्यावरील दूध संघ सोसायटीमध्ये एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे काल स्पष्ट झाले. काल रात्री उशिरा संबंधित युवकाच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामती शहरामध्ये अनेक दिवसांच्या कालखंडानंतर परत एकदा एका युवकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे बारामतीकरांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन दादासाहेब कांबळे यांनी केले.
शहरामध्ये १४ एप्रिल रोजी शेवटचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर बारामती शहरात एकही रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे की काय अशी भीती प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
बारामती शहरातील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले तरी सर्वांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. यानंतर शहरातील दूध संघ वसाहत हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहारांना बंदी घालण्यात आली आहे . मात्र, बारामती शहरातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून, बारामतीच्या दैनंदिन व्यवहारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर्सचा वापर करणे, तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच अनावश्यक कारणांसाठी बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.